शबनम न्यूज | प्रतिनिधी
पुणे रेल्वे स्थानकावर घडलेल्या एका थरारक घटनेत रेल्वे कर्मचाऱ्याच्या प्रसंगावधानामुळे एका वारकऱ्याचा जीव वाचला असून मोठा अपघात टळला आहे. पंढरपूर वारीनिमित्त पालखी दर्शनासाठी पुण्यात आलेले एक वृद्ध वारकरी चालत्या रेल्वेतून अचानक खाली पडल्याने काही क्षणांसाठी परिसरात एकच खळबळ उडाली.
प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, रेल्वे सुरू असतानाच वारकरी तोल जाऊन प्लॅटफॉर्म आणि रेल्वे रुळांच्या मधोमध पडले. काही सेकंदांत गंभीर अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली होती. मात्र त्याचवेळी ड्युटीवर असलेल्या मध्य रेल्वेच्या पुणे विभागातील सिग्नल अँड टेलिकम्युनिकेशन विभागाचे कर्मचारी आशीष वाघचौरे यांनी विलक्षण धाडस आणि प्रसंगावधान दाखवत तातडीने घटनास्थळी धाव घेतली.
स्वतःच्या जीवाची पर्वा न करता त्यांनी रुळांजवळ पडलेल्या वृद्ध वारकऱ्याला सुरक्षितपणे बाहेर ओढून घेतले. त्यांच्या या तत्परतेमुळे संभाव्य जीवघेणा अपघात टळला आणि एका वारकऱ्याचे प्राण वाचले.
या घटनेनंतर रेल्वे प्रशासन, सहकारी कर्मचारी आणि प्रवाशांकडून आशीष वाघचौरे यांच्या धाडसाचे आणि मानवतावादी भूमिकेचे कौतुक होत आहे. कर्तव्याच्या पलीकडे जाऊन दाखवलेल्या या साहसामुळे ते अनेकांसाठी प्रेरणास्थान ठरले आहेत.
पंढरपूर वारीच्या पार्श्वभूमीवर लाखो वारकरी रेल्वेने प्रवास करत असताना ही घटना घडली. त्यामुळे प्रवाशांनी रेल्वे प्रवासादरम्यान अधिक सावधगिरी बाळगावी, असे आवाहनही रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आले आहे.


