spot_img
spot_img
spot_img
spot_img

डेंग्यू, मलेरियाविरुद्ध महापालिकेची व्यापक प्रतिबंध मोहीम

शबनम न्यूज | प्रतिनिधी

पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर डेंग्यू, मलेरिया तसेच इतर संसर्गजन्य आजारांचा संभाव्य धोका लक्षात घेऊन पिंपरी चिंचवड महानगरपालिकेकडून शहरभर प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविण्यात येत आहेत. नागरिकांच्या आरोग्याचे संरक्षण करण्यासाठी स्वच्छता, जनजागृती आणि डास नियंत्रणाच्या विविध मोहिमा प्रभावीपणे राबविण्यात येत आहेत.

पावसाळ्यात साचलेले पाणी, अस्वच्छ परिसर तसेच दूषित अन्न व पाण्यामुळे संसर्गजन्य आजारांचा प्रसार होण्याची शक्यता वाढते. त्यामुळे घर व परिसर स्वच्छ ठेवणे, पाणी साचणार नाही याची काळजी घेणे, पिण्याचे पाणी उकळून किंवा शुद्ध करून वापरणे तसेच अन्नपदार्थ नेहमी झाकून ठेवावे असे आवाहन महापालिकेकडून करण्यात आले.

डासांची उत्पत्ती रोखण्यासाठी पाण्याच्या टाक्या, कुलर, फुलदाण्या, टायर तसेच इतर पाणी साचणाऱ्या वस्तूंची नियमित स्वच्छता करावी. नागरिकांनी आठवड्यातून किमान एकदा अशा ठिकाणांची तपासणी करून पाणी साचू देऊ नये, असे आवाहन करण्यात आले आहे.

महापालिकेकडून डासांच्या प्रादुर्भावावर नियंत्रण मिळविण्यासाठी अळीनाशक औषधांची फवारणी, डासांचा नायनाट करण्यासाठी धूर फवारणी (फॉगिंग), घराघरांत सर्वेक्षण, जनजागृती मोहीम तसेच आवश्यक त्या ठिकाणी प्रतिबंधात्मक औषध फवारणी नियमितपणे केली जात आहे. याशिवाय महापालिकेच्या वैद्यकीय विभागाकडून रुग्णालये व आरोग्य केंद्रांमध्ये संशयित रुग्णांची तपासणी आणि आवश्यक उपचारांची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

महापौर रवि लांडगे म्हणाले, “पावसाळ्यात संसर्गजन्य आजारांवर प्रभावी नियंत्रण मिळविण्यासाठी महापालिकेच्या उपाययोजनांसोबतच नागरिकांचे सक्रिय सहकार्यही तितकेच आवश्यक आहे. ताप, अंगदुखी, उलट्या, जुलाब किंवा इतर संशयास्पद लक्षणे आढळल्यास विलंब न करता जवळच्या आरोग्य केंद्रात जाऊन वैद्यकीय सल्ला घ्यावा. प्रत्येक नागरिकाने स्वच्छतेच्या सवयी अंगीकारून पाणी साचू न देण्याची काळजी घेतल्यास संसर्गजन्य आजारांवर प्रभावी नियंत्रण मिळविता येईल.”

आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी सांगितले, “पावसाळ्यात डेंग्यू, मलेरिया आणि इतर संसर्गजन्य आजारांचा धोका वाढत असल्याने प्रत्येक नागरिकाने स्वच्छता आणि प्रतिबंधात्मक उपायांना प्राधान्य देणे आवश्यक आहे. घर व परिसरात पाणी साचू न देणे, डासांची उत्पत्ती रोखणे आणि ताप किंवा इतर संशयास्पद लक्षणे आढळल्यास त्वरित वैद्यकीय सल्ला घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे. महापालिका प्रतिबंधात्मक उपाययोजना प्रभावीपणे राबवत असून नागरिकांनीही सक्रिय सहकार्य करून निरोगी, स्वच्छ पिंपरी चिंचवड घडविण्यास हातभार लावावा.

डेंग्यू आणि मलेरियासारख्या आजारांचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येक नागरिकाने स्वतःपासून स्वच्छतेची सुरुवात करणे गरजेचे आहे. परिसर स्वच्छ ठेवणे, पाणी साचू न देणे, डासांची उत्पत्ती रोखणे तसेच वैयक्तिक स्वच्छतेच्या सवयी अंगीकारणे हीच सर्वात प्रभावी प्रतिबंधात्मक उपाययोजना आहे. महापालिकेच्या आरोग्य विभागामार्फत शहरभर प्रतिबंधात्मक उपाय सातत्याने राबविण्यात येत असून नागरिकांच्या सहभागामुळेच निरोगी आणि स्वच्छ पिंपरी चिंचवडचे उद्दिष्ट अधिक प्रभावीपणे साध्य होईल असे उपआयुक्त डॉ. प्रदीप ठेंगल यावेळी म्हणाले.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!