पिंपरी-चिंचवड | प्रतिनिधी : युनूस खतीब
थेरगाव परिसरात जुन्या वादाच्या रागातून एका पेंटरवर भरदिवसा चाकूने जीवघेणा हल्ला झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या हल्ल्यात फिर्यादीसह त्यांच्या सहकाऱ्यालाही गंभीर दुखापत झाली असून वाकड पोलिसांनी आरोपीविरुद्ध खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ११ जुलै रोजी सकाळी पवारनगर येथील पानटपरीजवळ अविनाश बाबर आणि त्यांचे कॉन्ट्रॅक्टर विजय भोईर हे कामासाठी मजूर शोधत थांबले होते. यावेळी अभि उर्फ अभिषेक कोळेकर याने जुन्या भांडणाचा राग मनात धरून अविनाश बाबर यांच्याशी वाद घालत त्यांच्या मुलाला ठार मारण्याची धमकी दिली.
यानंतर मोबाईल नंबर मागण्याचा बहाणा करून आरोपीने अचानक धारदार चाकू काढत अविनाश बाबर यांच्यावर वार केले. तसेच मध्ये पडलेल्या विजय भोईर यांच्या पाठीवरही चाकूने हल्ला करून त्यांना जखमी केले. या हल्ल्यात दोघेही गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
या प्रकरणी अभि उर्फ अभिषेक कोळेकर याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम १०९(१) व २५१(२)(३) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास वाकड पोलीस करीत आहेत.


