शबनम न्यूज | प्रतिनिधी
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेल्या ‘”पावसाचे पाणी जिथे पडते, तिथेच त्याचे संवर्धन करा” या संदेशाला प्रतिसाद देत पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने यंदाच्या पावसाळ्यात पावसाचा प्रत्येक थेंब जतन करून भविष्यातील जलसुरक्षा मजबूत करण्यासाठी प्रत्येक नागरिकाने सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने केले आहे.
‘जिथे पाऊस पडतो, तिथेच पाणी साठवूया’ या संकल्पनेवर आधारित #कॅच द रेन अभियानांतर्गत पर्जन्यजल संधारण, भूजल पुनर्भरण आणि शाश्वत जलव्यवस्थापनाला चालना देण्यात येणार आहे. यासाठी घर, गृहनिर्माण संस्था, शाळा, महाविद्यालये, शासकीय व खासगी कार्यालये तसेच सार्वजनिक इमारतींमध्ये रेनवॉटर हार्वेस्टिंग प्रणाली प्रभावीपणे कार्यान्वित करणे, पाण्याचा काटकसरीने वापर करणे, विहिरी, तलाव, नाले व अन्य जलस्रोतांची स्वच्छता आणि पुनर्भरण करणे, तसेच ‘पाणी अडवा, पाणी जिरवा’ या संकल्पनेची प्रभावी अंमलबजावणी करण्यावर भर देण्यात येणार आहे.
या अभियानांतर्गत महापालिकेकडून शहरभर पर्जन्यजल संधारणाबाबत जनजागृती, जलस्रोतांचे संवर्धन, रेनवॉटर हार्वेस्टिंगला प्रोत्साहन तसेच नागरिकांच्या सहभागातून विविध उपक्रम राबविण्यात येणार असल्याचे महापालिकेने स्पष्ट केले आहे.
पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी म्हणाले, “पाणी ही केवळ नैसर्गिक संपत्ती नसून भावी पिढ्यांसाठी जपण्याची सामूहिक जबाबदारी आहे. पावसाचे पाणी ज्या ठिकाणी पडते, त्याच ठिकाणी साठविणे आणि जमिनीत मुरविणे ही काळाची गरज आहे. ” कॅच द रेन” ही केवळ सरकारी मोहीम नसून लोकसहभागातून यशस्वी होणारी जनचळवळ आहे. प्रत्येक नागरिक, संस्था आणि गृहनिर्माण सोसायटीने जलसंवर्धनाची जबाबदारी स्वीकारल्यास पाणीटंचाईवर प्रभावी मात करता येईल आणि जलसुरक्षित पिंपरी चिंचवड घडविता येईल.”
तर मुख्य अभियंता प्रमोद ओंभासे म्हणाले, “पावसाचे पाणी वाहून जाऊ न देता ते जमिनीत मुरविणे आणि साठविणे ही आजची अत्यावश्यक गरज आहे. रेनवॉटर हार्वेस्टिंग प्रणाली प्रभावीपणे कार्यान्वित करणे, विद्यमान जलस्रोतांचे संवर्धन करणे आणि पर्जन्यजल पुनर्भरणाच्या उपाययोजना राबविण्यात नागरिकांचा सहभाग महत्त्वाचा आहे. प्रत्येकाने आपल्या परिसरात जलसंवर्धनाची छोटी-छोटी कामे केली, तरी त्याचा शहराच्या जलसुरक्षेवर दीर्घकालीन सकारात्मक परिणाम होईल.”
पावसाचा प्रत्येक थेंब भविष्यासाठी महत्त्वाचा असून आजचे जलसंवर्धन उद्याच्या पिढ्यांसाठी सुरक्षित आणि शाश्वत जलस्रोत निर्माण करण्याची गुरुकिल्ली आहे. त्यामुळे यंदाच्या पावसाळ्यात “पाणी वाचवा, पाणी साठवा, भविष्य घडवा” हा संदेश कृतीत उतरवत प्रत्येक नागरिकाने ” कॅच द रेन” अभियानात उत्स्फूर्त सहभाग नोंदवावा, असे आवाहन पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे सह शहर अभियंता अजय सूर्यवंशी यांनी केले आहे.


