spot_img
spot_img
spot_img

निगडी प्राधिकरणात विविध भारती प्रस्तुत सुमधुर हिंदी – मराठी गीतांची मैफल संपन्न

शबनम न्यूज | प्रतिनिधी

विविध भारती म्युझिकल इव्हेंट प्रस्तुत ‘आजकल पाँव जमींपर नहीं पडते मेरे…’ या नि:शुल्क सुमधुर हिंदी – मराठी चित्रपटगीतांची कराओके सांगीतिक मैफल निगडी प्राधिकरणातील गदिमा नाट्यगृहात रविवार, दिनांक ११ जुलै २०२६ रोजी संपन्न झाली. या सांगीतिक मैफलीत दिशा सोशल फाउंडेशनचे माजी कार्याध्यक्ष सचिन साठे, किरण साळी, मोहन भस्मे, विकास जगताप, सूर्यकांत ताम्हाणे, नीळकंठ निमगावकर, नरेंद्र जोशी, राजेंद्र पगारे, डाॅ. संजीवकुमार लोंढे यांची प्रमुख उपस्थिती होती.

शुभांगी पवार, नेहा दंडवते, स्मिता गायकवाड, सीमा पोडाला, अनुराधा साळवी, डाॅ. कविता बोंडे, डाॅ. सुमेध अंदूरकर, पंकज कथलकर, विश्वांत काळोखे, दिनेश कर्वे, संजय बोरसे, अरुण सरमाने, नंदकुमार कांबळे आणि विनायक कदम या गायक कलाकारांनी आपल्या एकल आणि युगुलस्वरातील श्रवणीय गीतांच्या सादरीकरणाने श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले. ‘साँसोंकी जरुरत हैं…’ , ‘अभी अभी थी दुष्मनी…’ , ‘बेकरार करके हमें…’ , ‘यें रातें नयी पुरानी…’ , ‘सजना बैरी हो गये…’ , ‘मैं तो हर मोड पर…’ , ‘राॅकी मेरा नाम…’ , ‘छम छम करता हैं…’ , ‘अक्सर इस दुनिया में…’ , ‘मैं जट यमला…’ या एकल स्वरातील गीतांसोबतच ‘नुरी…’ , ‘मेरा प्यार भी तू हैं…’ , ‘जिये तो जिये कैसें…’ , ‘मैं अगर सामने…’ , ‘हाय रे हाय…’ , ‘जिंदगी नाम दोस्ती…’ , ‘जानेमन जानेमन…’ , ‘कोई मिल गया…’ , ‘ये हसी वादियाँ…’ , ‘तुमसा कोई प्यारा…’ , ‘ओ मेरी जान…’ , ‘कोरा कागज था…’ या युगुलस्वरातील गीतांना रसिक श्रोत्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

पंढरी वारीच्या पार्श्‍वभूमीवर ‘विठू माउली तू…’ या मराठी भक्तिगीताला श्रोत्यांनी टाळ्यांची साथसंगत केली; तर कुमार सानू यांनी गायलेल्या गीतांची मालिका श्रोत्यांना विशेष भावली. अभिजात लोकप्रिय गीतांसोबतच काहीशी विस्मरणात गेलेली श्रवणीय गीते मैफलीत सादर झाल्याने स्मरणरंजनाचा आनंद श्रोत्यांना अनुभवता आला. प्रत्येक गीतासोबत चढत्या क्रमाने रंगतदार होत गेलेल्या या सांगीतिक मैफलीने ‘आजकल पाँव जमींपर नहीं पडते मेरे…’ या शीर्षकगीताच्या अप्रतिम सादरीकरणाने कळसाध्याय गाठला. नंदकुमार कांबळे यांची संकल्पना आणि विनायक कदम यांचे आयोजन असलेली ही नि:शुल्क सांगीतिक मैफल सचिन शेटे यांच्या विशेष सहकार्यातून साकार झाली. शैलेश घावटे यांनी दृकश्राव्यचित्रण केले. आकाश गाजूल यांनी छायाचित्रण केले; तर श्वेता इराजदार आणि अरुण सरमाने यांनी खुसखुशीत शैलीतून निवेदन केले.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!