पिंपरी-चिंचवड प्रतिनिधी / युनूस खतीब
चाकण परिसरात सुरू असलेल्या अवैध जुगार व्यवसायाविरोधात उत्तर चाकण पोलिसांनी कारवाई करत कल्याण मटका जुगार अड्ड्यावर छापा टाकून तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या कारवाईत रोख रक्कम आणि मटका जुगाराचे साहित्य जप्त करण्यात आले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ९ जुलै रोजी सायंकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमारास शनी मंदिराच्या मागे, चाकण (ता. खेड) येथे काही व्यक्ती कल्याण मटका जुगार चालवत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार उत्तर चाकण पोलिसांनी छापा टाकला असता आरोपी मटका जुगार खेळताना आढळून आले.
या कारवाईत चंद्रकांत माणिकराव नायटे (वय ४५), नितीन लक्ष्मण आल्हाट (वय ४६) आणि अनिल ज्ञानेश्वर शेलार (वय ५७) यांच्याविरुद्ध मुंबई जुगार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी घटनास्थळावरून ३ हजार ५० रुपये रोख रक्कम तसेच मटका जुगाराची नोंद असलेले वहीचे पान जप्त केले. आरोपींकडून कल्याण मटका प्रकारचा अवैध जुगार सुरू असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.
या प्रकरणी उत्तर चाकण पोलीस ठाण्यात मुंबई जुगार कायदा कलम १२ (अ) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपींना नोटीस बजावण्यात आली आहे.
अवैध जुगार, मटका आणि तत्सम गैरकृत्यांविरोधात कारवाई सुरूच राहणार असल्याचा इशारा पोलिसांनी दिला आहे. पुढील तपास पोलीस शिपाई महेश कोळी यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.


