शबनम न्यूज | प्रतिनिधी
मावळ तालुक्यातील पाटण गावावर शनिवारी पहाटे दुर्दैवाचा डोंगर कोसळला. मुसळधार पावसामुळे विसापूर किल्ला परिसरातील डोंगरकडा कोसळून नंदू दत्तू तिकोणे, त्यांच्या पत्नी अनिता तिकोणे आणि वर्षभरापूर्वीच विवाह झालेला त्यांचा मुलगा ज्ञानेश्वर तिकोणे यांचा ढिगाऱ्याखाली दबून दुर्दैवी मृत्यू झाला. या हृदयद्रावक दुर्घटनेमुळे संपूर्ण मावळ तालुक्यावर शोककळा पसरली.
या भीषण घटनेची माहिती मिळताच राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी पाटण गावाला भेट देत दुर्घटनास्थळाची पाहणी केली. त्यांनी बाधित कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले तसेच मयत ज्ञानेश्वर तिकोणे यांच्या गरोदर पत्नीला धीर देत शासन त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे असल्याचा विश्वास दिला.
यावेळी उपमुख्यमंत्री पवार यांनी मृतांच्या वारसांना प्रत्येकी ₹४ लाखांप्रमाणे एकूण ₹१२ लाखांची आर्थिक मदत तातडीने मंजूर करून संबंधित रक्कम लाभार्थ्यांच्या खात्यात जमा करण्यात आल्याची माहिती दिली. तसेच दुर्घटनेत पूर्णपणे जमीनदोस्त झालेल्या घरासाठी ₹१ लाख २० हजारांची शासकीय मदत त्वरित देण्याचे आदेश प्रशासनाला दिले.
या प्रसंगी मावळचे आमदार सुनील आण्णा शेळके, पंचायत समितीचे सभापती, उपसभापती, जिल्हा परिषद सदस्य, राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी, प्रशासनातील अधिकारी तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या दुर्घटनेने पावसाळ्यात डोंगरपायथ्याशी राहणाऱ्या नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून, अशा संवेदनशील भागातील कुटुंबांचे तातडीने सर्वेक्षण करून आवश्यक प्रतिबंधात्मक उपाययोजना आणि पुनर्वसनाची मागणी स्थानिकांकडून होत आहे.


