spot_img
spot_img
spot_img

बनावट बुकिंग ऑर्डरचा डाव; ट्रान्सपोर्ट कंपनीची तब्बल ६५.६८ लाखांची फसवणूक

पिंपरी-चिंचवड, प्रतिनिधी : युनूस खतीब

भोसरीतील एका ट्रान्सपोर्ट कंपनीची बनावट बुकिंग ऑर्डर आणि आगाऊ रकमेच्या नावाखाली तब्बल ६५ लाख ६८ हजार ५६५ रुपयांची फसवणूक झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी भोसरी पोलीस ठाण्यात दोन जणांविरुद्ध फसवणूक, बनावट कागदपत्रे तयार करणे आणि कट रचल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, डिसेंबर २०२५ ते मार्च २०२६ या कालावधीत इंद्रायणीनगर येथील जीजीआर ट्रान्सपोर्ट कार्यालयात हा प्रकार घडला. आरोपी जयंतीकुमारी नितेंद्र प्रसाद (रा. झारखंड) आणि अनिल अरुण नारळे (रा. काळेवाडी) यांनी संगनमत करून ट्रान्सपोर्ट व्यवसायासाठी खोटे बुकिंग ऑर्डर सादर केले. तसेच जीजीआर कंपनीचे मालक गगन सिंगविर्दी यांच्याकडून वेळोवेळी आगाऊ रक्कम घेत कंपनीची आर्थिक फसवणूक केली.

या फसवणुकीत कंपनीचे एकूण ६५.६८ लाख रुपयांचे नुकसान झाल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. तक्रारीनंतर भोसरी पोलिसांनी भारतीय न्याय संहितेतील फसवणूक, विश्वासघात, बनावट कागदपत्रे तयार करणे आणि कट रचणे या कलमांनुसार गुन्हा दाखल केला आहे.

या प्रकरणातील दोन्ही आरोपी अद्याप फरार असून त्यांचा शोध सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक काटे करीत आहेत.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!