पिंपरी-चिंचवड | प्रतिनिधी : युनूस खतीब
पिंपळे गुरव येथील लक्ष्मीनगर परिसरात मालमत्तेच्या वादातून एका व्यक्तीचा निर्घृण खून झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी सांगवी पोलिसांनी एका आरोपीला अटक केली आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, कन्नन बालकृष्ण पदाची (मृत) आणि आरोपी सेल्वराज राजगाम (वय ५२, रा. पिंपळे गुरव) यांच्यात मालमत्तेच्या कारणावरून वाद सुरू होता. या वादातून आरोपीने मृताच्या डोक्यात दगडी फरशीने वार करून तसेच लोखंडी रॉडने गळ्यावर वार करत त्याचा खून केल्याचा आरोप आहे.
ही घटना २८ जून रोजी पहाटे अडीचच्या सुमारास लक्ष्मीनगर लेन क्रमांक ४ येथील वैष्णवी शॉपजवळ घडली. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक विजय शेळार यांनी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून, भारतीय न्याय संहिता कलम १०३(१) तसेच शस्त्र अधिनियम कलम ४(२५), ४(२७) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सांगवी पोलीस पुढील तपास करीत आहेत.


