spot_img
spot_img
spot_img

डिलिव्हरी फ्रँचायझीच्या नावाखाली ५.२२ लाखांची ऑनलाइन फसवणूक; सायबर गुन्हा दाखल

पिंपरी-चिंचवड | प्रतिनिधी : युनूस खतीब

डिलिव्हरी फ्रँचायझी मिळवून मोठा नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवत एका व्यावसायिकाची तब्बल ५ लाख २२ हजार ८३७ रुपयांची ऑनलाइन फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी दिघी पोलीस ठाण्यात सायबर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी अद्याप फरार आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अतुल नामदेव वहिले (वय ३८, रा. व्हिजन रिदम सोसायटी, डुडुळगाव) यांना सोशल मीडियावरील डिलिव्हरी फ्रँचायझीच्या जाहिरातीद्वारे संपर्क करण्यात आला. आरोपींनी स्वतःला कंपनीचे प्रतिनिधी असल्याचे भासवून व्हॉट्सअ‍ॅप कॉल, संदेश तसेच ई-मेलद्वारे विश्वास संपादन केला.

प्रियांका सिंग, सौरभ कुमार आणि इतर अज्ञात व्यक्तींनी डिलिव्हरी फ्रँचायझीमधून मोठा आर्थिक फायदा करून देण्याचे आश्वासन देत विविध बँक खात्यांमध्ये पैसे जमा करण्यास प्रवृत्त केले. २१ मे ते २० जून २०२६ या कालावधीत फिर्यादीकडून टप्प्याटप्प्याने ५,२२,८३७ रुपये उकळण्यात आले.

फसवणुकीचा संशय आल्यानंतर फिर्यादीने पोलिसांकडे धाव घेतली. याप्रकरणी भारतीय न्याय संहिता कलम ३१६(२), ३१८(४), ३(५) तसेच माहिती तंत्रज्ञान अधिनियम २००८ च्या कलम ६६(सी) व ६६(डी) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सायबर फसवणुकीच्या वाढत्या घटनांच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सोशल मीडिया जाहिराती, फ्रँचायझी ऑफर आणि मोठ्या नफ्याचे आमिष दाखविणाऱ्या योजनांबाबत सावध राहण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक भोईर करीत आहेत.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!