spot_img
spot_img
spot_img

दापोडीत एमडी ड्रग्जसह दोघांना अटक; १०.८५ लाखांचा मुद्देमाल जप्त

पिंपरी-चिंचवड | प्रतिनिधी : युनूस खतीब

अंमली पदार्थविरोधी पथकाने दापोडी परिसरात कारवाई करत एमडी (मेफेड्रॉन) या अंमली पदार्थासह दोघांना अटक केली आहे. आरोपींकडून सुमारे १० लाख ८५ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २८ जून रोजी पहाटे एमएनजीएल सीएनजी पंपाशेजारी, सुदामाचे पोहे हॉटेलसमोर, जुना पुणे-मुंबई महामार्गावरील सर्व्हिस रोड परिसरात सापळा रचून ही कारवाई करण्यात आली. यावेळी आर्यन रवींद्र यादव (वय २०, रा. न्यू मोदीखाना कॅम्प, पुणे) आणि शोएब शकील शेख उर्फ वस्ताद (वय २५, रा. रविवार पेठ, पुणे) यांना ताब्यात घेण्यात आले.

तपासादरम्यान आरोपींकडून ९८.५६ ग्रॅम वजनाचा एमडी (मेफेड्रॉन) हा अंमली पदार्थ, दुचाकी आणि मोबाईल फोन असा एकूण १०.८५ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. आरोपी अंमली पदार्थ विक्रीसाठी वाहतूक करत असल्याचे निष्पन्न झाले.

याप्रकरणी दापोडी पोलीस ठाण्यात एनडीपीएस कायदा कलम ८(क), २२(क) व २९ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अटक आरोपींकडून अंमली पदार्थांचा पुरवठा करणाऱ्या इतर संशयितांची माहिती मिळविण्यासाठी चौकशी सुरू असून, या रॅकेटमागील साखळी उघड करण्यासाठी पोलिसांचे प्रयत्न सुरू आहेत.

पुढील तपास अंमली पदार्थ विरोधी पथक व दापोडी पोलीस करीत आहेत.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!