पिंपरी-चिंचवड | प्रतिनिधी : युनूस खतीब
मारुंजी येथील बांधकाम साईटवर सुरक्षा नियमांचे पालन न केल्यामुळे एका कामगाराचा मृत्यू झाल्याप्रकरणी हिंजवडी पोलिसांनी बिल्डर आणि ठेकेदाराविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १२ मार्च २०२६ रोजी सेव्हन स्टार सिटी, मारुंजी येथील बांधकाम साईटवर कामगार अशोक महांगरे हे जिन्यातून बांधकाम साहित्य वर नेत असताना चौथ्या मजल्यावरून खाली पडले. गंभीर जखमी झालेल्या महांगरे यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
तपासात बांधकाम साईटवरील जिन्यांना सुरक्षा जाळी, कठडे तसेच कामगारांसाठी आवश्यक सुरक्षा साधने उपलब्ध करून देण्यात आली नसल्याचे समोर आले. कामगारांचा जीव धोक्यात येऊ शकतो याची जाणीव असतानाही योग्य सुरक्षा उपाययोजना न करता काम सुरू ठेवण्यात आल्याचा आरोप आहे.
याप्रकरणी हिंजवडी पोलिसांनी बिल्डर व्यंकट रामानौ सांगना आणि ठेकेदार संजय रामसुख राजभर यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम १०५ व ३(५) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक कांदे करत आहेत.


