spot_img
spot_img
spot_img

नाशिक फाटा-खेड महामार्ग भूसंपादनासाठी निधी उपलब्ध करा!

– मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मागणीचे निवेदन
– महापालिका, प्राधिकरण प्रशासनाला केली सूचना
– राज्य सरकारचा निधी मिळेपर्यंत तात्पुरत्या निधीची तजवीज करा

पिंपरी-चिंचवड | प्रतिनिधी

पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील नाशिक फाटा ते खेड-राजगुरूनगर मार्गाच्या भूसंपादनासाठी राज्य सरकारकडून निधी उपलब्ध होईपर्यंत पिंपरी-चिंचवड महानगरपालिका (PCMC) आणि पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (PMRDA) यांच्या माध्यमातून आवश्यक निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी आमदार महेश लांडगे यांनी केली आहे. याबाबत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पत्राद्वारे मागणी केली असून, महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी आणि पीएमआरडीएचे महानगर आयुक्त डॉ. अभिजित चौधरी यांना सूचना केली आहे.

पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्ग हा पुणे, पिंपरी-चिंचवड, चाकण आणि खेड-राजगुरूनगरसह औद्योगिक क्षेत्रांना जोडणारा महत्त्वाचा मार्ग आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी या मार्गाचे एलिव्हेटेड कॉरिडॉरमध्ये रूपांतर करण्याची घोषणा केली असून, त्यासाठी निविदा प्रक्रिया सुरू आहे. मात्र, भूसंपादनासाठी राज्य सरकारचा निधी अद्याप उपलब्ध न झाल्याने प्रकल्पाची अंमलबजावणी रखडल्याचे लांडगे यांनी नमूद केले आहे.

नाशिक फाटा ते चाकण आणि खेडदरम्यान वाढत्या नागरीकरणामुळे दररोज मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी होत आहे. अवघ्या ३० किलोमीटरच्या प्रवासासाठी दोन ते तीन तासांचा कालावधी लागत असून, नागरिकांचा वेळ आणि इंधन मोठ्या प्रमाणात वाया जात असल्याचे त्यांनी पत्रात म्हटले आहे.

भूसंपादनाची प्रक्रिया तातडीने पूर्ण करण्यासाठी राज्य सरकारचा निधी मिळेपर्यंत PCMC आणि PMRDA यांनी त्यांच्या अर्थसंकल्पातून तात्पुरता निधी उपलब्ध करून द्यावा. राज्य सरकारचा निधी प्राप्त झाल्यानंतर तो संबंधित संस्थांना परत करता येईल, असा पर्यायही त्यांनी सुचविला आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीतील नाशिक फाटा ते खेड मार्गासाठी १ लाख २३ हजार ८४३ चौरस मीटर भूसंपादनाकरिता सुमारे २६२.७९ कोटी रुपयांची आवश्यकता आहे. तर PMRDA हद्दीतील १०.५०१३ हेक्टर क्षेत्राच्या भूसंपादनासाठी सुमारे २८८ कोटी रुपयांचा निधी लागणार असल्याचे पत्रात नमूद करण्यात आले आहे.

या पार्श्वभूमीवर संबंधित विभागांना तातडीच्या सूचना देऊन PCMC आणि PMRDA यांच्या माध्यमातून भूसंपादनासाठी आवश्यक निधी उभारण्याबाबत कार्यवाही करावी, अशी विनंती आमदार लांडगे यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. या निर्णयामुळे भूसंपादन प्रक्रियेला गती मिळून पुणे-नाशिक महामार्गाच्या रुंदीकरणाचे काम वेळेत पूर्ण होईल तसेच नागरिक, उद्योजक आणि औद्योगिक क्षेत्राला वाहतूक कोंडीतून मोठा दिलासा मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.

“पुणे-नाशिक महामार्ग हा राज्यातील सर्वाधिक वर्दळीच्या आणि औद्योगिकदृष्ट्या महत्त्वाच्या मार्गांपैकी एक आहे. भूसंपादनासाठी निधीअभावी प्रकल्प रखडणे परवडणारे नाही. त्यामुळे राज्य सरकारचा निधी उपलब्ध होईपर्यंत PCMC आणि PMRDA यांनी तात्पुरता निधी उपलब्ध करून भूसंपादनाची प्रक्रिया तातडीने पूर्ण करावी. या निर्णयामुळे प्रकल्पाला गती मिळेल, वाहतूक कोंडी कमी होईल आणि लाखो नागरिक, उद्योजक व औद्योगिक क्षेत्राला मोठा दिलासा मिळेल.”
 – महेश लांडगे, आमदार, भाजपा, पिंपरी-चिंचवड, पुणे.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!