spot_img
spot_img
spot_img

नेवाळे वस्तीतील धोकादायक स्टॉर्म वॉटर लाईनचे निकृष्ट काम; दुर्घटनेची भीती

पिंपरी-चिंचवड | प्रतिनिधी

प्रभाग क्रमांक ११ मधील नेवाळे वस्ती परिसरात, बर्ड्स इंटरनॅशनल स्कूल शेजारी करण्यात आलेल्या स्टॉर्म वॉटर लाईनच्या कामामध्ये गंभीर त्रुटी आणि निकृष्ट दर्जाचे काम झाल्याचे उघड झाले आहे. रस्त्याच्या मध्यभागी असलेले चेंबर तुटलेल्या अवस्थेत उघडे पडले असून, केवळ प्लास्टिक बॅरिकेड लावून प्रशासनाने तात्पुरती उपाययोजना केल्याचे दिसून येत आहे. या मार्गावरून दररोज शेकडो विद्यार्थी, पालक आणि नागरिकांची ये-जा होत असल्याने मोठ्या अपघाताची भीती व्यक्त केली जात आहे.

माजी नगरसेवक संजय नेवाळे आणि मारुती जाधव यांनी पावसाळ्यापूर्वीच स्टॉर्म वॉटर लाईन, ड्रेनेज लाईन तसेच नाल्यांची स्वच्छता आणि दुरुस्ती करण्याबाबत संबंधित अधिकाऱ्यांना लेखी निवेदन देऊन तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली होती. मात्र, वारंवार पाठपुरावा करूनही प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे.

सध्या चेंबर तुटलेले असून काँक्रीटचे तुकडे रस्त्यावर विखुरलेले आहेत. निकृष्ट दर्जाच्या कामामुळे नागरिकांच्या सुरक्षेला गंभीर धोका निर्माण झाला आहे. एखादा दुचाकीस्वार किंवा शाळकरी विद्यार्थी उघड्या चेंबरमध्ये पडून दुर्घटना घडल्यास त्याला जबाबदार कोण, असा संतप्त सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.

याबाबत मारुती जाधव म्हणाले, “प्रभागातील नागरिकांच्या हितासाठी आणि सुरक्षिततेसाठी आम्ही सातत्याने प्रशासनाकडे पाठपुरावा करत आहोत. आमचा उद्देश राजकारण करणे नसून नागरिकांचे प्राण वाचवणे हा आहे. प्रशासनाने तातडीने निकृष्ट कामांची चौकशी करून दोषी ठेकेदार आणि संबंधित अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करावी.”

नागरिकांच्या जीवाशी खेळ करणाऱ्या अशा निष्काळजीपणाला वेळीच आळा घालणे गरजेचे असल्याची भावना स्थानिकांकडून व्यक्त होत आहे. अन्यथा एखादी गंभीर दुर्घटना घडल्यास त्याची नैतिक आणि कायदेशीर जबाबदारी संबंधित अधिकारी, ठेकेदार आणि दुर्लक्ष करणाऱ्या यंत्रणेवरच राहील, असा इशाराही नागरिकांनी दिला आहे.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!