शबनम न्यूज | प्रतिनिधी
पिंपरी-चिंचवड : प्रभाग क्रमांक १ चिखली-म्हेत्रेवस्ती परिसरात ७ ते ८ भटक्या कुत्र्यांनी एका लहान मुलीवर हिंस्त्र हल्ला करून तिला गंभीर जखमी केल्याची घटना घडली आहे. जखमी बालिकेवर रुग्णालयात उपचार सुरू असून या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर नगरसेवक तथा शिक्षण समिती सदस्य कु. यश दत्ताकाका साने यांनी महापालिका आयुक्त आणि पशुवैद्यकीय विभागाच्या उपायुक्तांकडे लेखी निवेदन देत तातडीने कठोर उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.
महापालिकेच्या मागील सर्वसाधारण सभेत शहरातील भटक्या कुत्र्यांचा उपद्रव रोखण्यासाठी प्रभागनिहाय विशेष अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली होती. मात्र, प्रभाग क्रमांक १ मध्ये संबंधित यंत्रणेच्या निष्काळजीपणामुळे आणि ढिसाळ नियोजनामुळे ही दुर्दैवी घटना घडल्याचा आरोप यश साने यांनी केला आहे.
विशेष पथक तातडीने तैनात करण्याची मागणी
म्हेत्रेवस्ती तसेच संपूर्ण चिखली परिसरातील पिसाळलेल्या व हिंसक भटक्या कुत्र्यांचा तातडीने बंदोबस्त करण्यासाठी महापालिकेचे विशेष पथक तैनात करावे, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.
तसेच भटक्या कुत्र्यांच्या नियंत्रणाचे काम पाहणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांच्या कामाची चौकशी करून, कर्तव्यात हलगर्जीपणा आढळल्यास त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करावी, अशी मागणीही करण्यात आली आहे.
तीन दिवसांत नसबंदी आणि लसीकरण मोहीम
चिखली प्रभागात पुढील तीन दिवसांत युद्धपातळीवर भटक्या कुत्र्यांचे निर्बीजीकरण (नसबंदी) आणि रेबीज प्रतिबंधक लसीकरण मोहीम राबवावी. या मोहिमेचा दैनंदिन अहवाल प्रशासनाने सादर करावा, अशी मागणी यश साने यांनी केली आहे.
“नागरिकांच्या करातून अधिकाऱ्यांचे वेतन आणि प्रशासकीय खर्च भागवला जातो. त्यामुळे नागरिकांच्या सुरक्षिततेची जबाबदारी प्रशासनाची आहे. निष्पाप बालिकेवर झालेल्या या हल्ल्याची गांभीर्याने दखल घेऊन दोषींवर कठोर कारवाई झाली पाहिजे,” अशी भूमिका साने यांनी मांडली.
२४ तासांचा अल्टिमेटम; अन्यथा आंदोलनाचा इशारा
चिखली-म्हेत्रेवस्ती परिसरातील नागरिक आणि लहान मुलांच्या सुरक्षेसाठी २४ तासांच्या आत ठोस उपाययोजना न केल्यास संतप्त नागरिकांसह महापालिका मुख्यालयासमोर तीव्र लोकआंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा यश दत्ताकाका साने यांनी दिला आहे.
दरम्यान, चिखली परिसरातील नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न लक्षात घेता महापालिका प्रशासनाने या घटनेची तातडीने दखल घेऊन भटक्या कुत्र्यांच्या समस्येवर कायमस्वरूपी उपाययोजना करावी, अशी मागणी नागरिकांकडूनही होत आहे.



