पिंपरी-चिंचवड | प्रतिनिधी
राष्ट्रीय श्रमिक आघाडीचे संस्थापक अध्यक्ष मा. यशवंतभाऊ भोसले हे राज्यव्यापी कर्मचारी व कामगार संपर्क दौऱ्यावर जाणार असून, शनिवार (दि. २८ जून) ते सोमवार (दि. ३० जून) या कालावधीत पिंपरी-चिंचवड, पंढरपूर, सोलापूर, तुळजापूर, लातूर आणि छत्रपती संभाजीनगर येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
या दौऱ्यादरम्यान विविध औद्योगिक क्षेत्रातील कर्मचारी, कामगार, संघटनांचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी प्रत्यक्ष संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेण्यात येणार आहेत. तसेच प्रलंबित कामगार प्रश्नांवर मार्गदर्शन, संघटनात्मक भूमिका, न्यायालयीन बाबी आणि कर्मचारी हिताच्या विविध विषयांवर सविस्तर चर्चा होणार असल्याची माहिती देण्यात आली.
दौऱ्याची सुरुवात २८ जून रोजी पिंपरी-चिंचवड येथून होणार असून, त्यानंतर दौंड-कुरकुंभ एमआयडीसी, पंढरपूर आणि सोलापूर येथे कर्मचारी व कामगार मेळावे आयोजित करण्यात आले आहेत. २९ जून रोजी तुळजापूर, लातूर येथे विविध बैठका व कार्यकारिणी सभांचे आयोजन करण्यात आले आहे. तर ३० जून रोजी छत्रपती संभाजीनगर येथे पत्रकार परिषद तसेच राष्ट्रीय श्रमिक आघाडीच्या सदस्यांचा भव्य कर्मचारी मेळावा होणार आहे.
या संपर्क दौऱ्यामुळे विविध भागातील कर्मचारी व कामगारांना संघटनेच्या माध्यमातून आपले प्रश्न प्रभावीपणे मांडण्याची संधी उपलब्ध होणार असून, त्यांना योग्य मार्गदर्शनही मिळणार असल्याचे संपर्कप्रमुख अमोल घोरपडे यांनी सांगितले आहे.


