पिंपरी चिंचवड | प्रतिनिधी : युनूस खतीब
बँकेचे कर्ज थकल्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने जप्त करण्यात आलेल्या फ्लॅटचे सील व कुलूप तोडून बेकायदेशीरपणे ताबा घेतल्याप्रकरणी तिघांविरुद्ध रावेत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, निगडी प्राधिकरणातील निसर्ग दर्शन को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी येथील फ्लॅट क्रमांक बी-116 हा बँक ऑफ इंडिया, देहूरोड शाखेकडे 50 लाख रुपयांच्या कॅश क्रेडिट कर्जासाठी तारण ठेवण्यात आला होता. कर्जाची परतफेड न झाल्याने जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार सदर फ्लॅट जप्त करून सील करण्यात आला होता.
मात्र, आरोपी मिरा विलास परदेशी, मिलिंद विलास परदेशी आणि योगिनी विलास परदेशी यांनी लॉक कटरच्या सहाय्याने फ्लॅटचे सील व कुलूप तोडून अनधिकृतपणे फ्लॅटमध्ये प्रवेश करून त्याचा ताबा घेतल्याचा आरोप आहे.
याप्रकरणी 24 जून 2026 रोजी गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपींना अद्याप अटक करण्यात आलेली नाही. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक टार्फे करीत आहेत.


