पिंपरी-चिंचवड प्रतिनिधी | युनूस खतीब
वाकड परिसरात बेकायदेशीररित्या गावठी हातभट्टीची दारू विक्री करणाऱ्या एका महिलेला दारुबंदी विरोधी पथकाने ताब्यात घेतले आहे. कारवाईदरम्यान ३८ लिटर गावठी दारू जप्त करण्यात आली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २३ जून रोजी सकाळी साडेसातच्या सुमारास अष्टविनायक कॉलनी, दत्त मंदिर रोड, वाकड येथे बेकायदेशीर दारू विक्री सुरू असल्याची माहिती दारुबंदी विरोधी पथकाला मिळाली होती. त्यानुसार छापा टाकण्यात आला.
या कारवाईत विद्या अनिल राठोड (वय ४०) हिला ताब्यात घेण्यात आले. तिच्या ताब्यातून ३८ लिटर गावठी हातभट्टीची तयार दारू जप्त करण्यात आली असून जप्त मालाची किंमत सुमारे ३,८०० रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले.
प्राथमिक तपासात ही दारू विक्रीसाठी बेकायदेशीररित्या साठवून ठेवण्यात आल्याचे निष्पन्न झाले आहे. याप्रकरणी महाराष्ट्र दारुबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणातील आणखी एक संशयित महिला जयश्री राजपूत हिचा शोध सुरू आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास दारुबंदी विरोधी पथक करीत आहे.


