शबनम न्यूज | प्रतिनिधी
जागतिक आरोग्य संघटनेने सन १९८८ मध्ये पोलिओ निर्मूलनाचे ध्येय निश्चित केले असून, त्याअनुषंगाने देशात सन १९९५ पासून राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहीम सातत्याने राबविण्यात येत आहे. या मोहिमेच्या माध्यमातून ५ वर्षांखालील सर्व बालकांना पोलिओ प्रतिबंधक लसीचे दोन थेंब देऊन त्यांचे संरक्षण करण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे.
याच पार्श्वभूमीवर पिंपरी चिंचवड महानगरपालिका वैद्यकीय विभागामार्फत रविवार, दि. २८ जून २०२६ रोजी राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेचे आयोजन करण्यात आले असून, शहरातील सर्व पालकांनी आपल्या ० ते ५ वर्षे वयोगटातील बालकांना पोलिओ प्रतिबंधक लसीचे दोन थेंब अवश्य पाजावेत, असे आवाहन महापौर रवि लांडगे यांनी केले आहे.
या मोहिमेअंतर्गत दि. २८ जून २०२६ रोजी सकाळी ८ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत शहरातील विविध पोलिओ बूथवर बालकांना पोलिओचे दोन थेंब देण्यात येणार आहेत. त्यानंतर दि. २९ जून ते ३ जुलै २०२६ या कालावधीत आरोग्य कर्मचारी घरभेटी देऊन राहिलेल्या बालकांचे लसीकरण करणार आहेत.
११२३ लसीकरण केंद्रांची स्थापना व सुमारे ५००० कर्मचाऱ्यांची नियुक्ती…
शहरातील ५ वर्षांखालील सर्व बालकांपर्यंत लसीकरण सेवा पोहोचविण्यासाठी महानगरपालिकेमार्फत एकूण ११२३ लसीकरण केंद्रांची स्थापना करण्यात आली आहे. यामध्ये महानगरपालिका दवाखाने, रुग्णालये, मोठी खासगी रुग्णालये आणि अंगणवाडी केंद्रांमध्ये १००८ स्थायी लसीकरण केंद्रे उभारण्यात आली आहेत. तसेच बस स्थानके, रेल्वे स्थानके आणि मेट्रो स्थानकांवर ३५ ट्रान्झिट लसीकरण केंद्रे, तर वीटभट्ट्या, बांधकामे आणि स्थलांतरित कुटुंबांच्या वस्त्यांमध्ये ७७ फिरती लसीकरण केंद्रे कार्यरत राहणार आहेत. याशिवाय, रात्रीच्या वेळेतही लसीकरण सेवा पोहोचविण्यासाठी तीन नाईट टीम कार्यरत असतील.
सदर मोहीम प्रभावीपणे राबविण्यासाठी ८ विभागीय प्रभारी वैद्यकीय अधिकारी, ९५ वैद्यकीय अधिकारी, ३१९ पर्यवेक्षक आणि ४५५२ लसीकरण कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. तसेच एएनएम, एमपीडब्ल्यू, आशा स्वयंसेविका, अंगणवाडी सेविका व मदतनीस, विविध महाविद्यालयांतील विद्यार्थी, महिला आरोग्य समिती सदस्य, रोटरी क्लबचे स्वयंसेवक आणि इतर स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी या मोहिमेत सहभागी झाले आहेत.
मोहिमेच्या जनजागृतीसाठी शहरभर पत्रके, बॅनर्स, स्टीकर्स, वॉल पेंटिंग, व्हि.एम.डी डिस्प्ले (VMD), सार्वजनिक ठिकाणी ध्वनीक्षेपकाद्वारे आवाहन तसेच विविध सोशल मीडिया माध्यमांद्वारे व्यापक जनजागृती करण्यात येत आहे.


