मावळच्या प्रश्नांवर तातडीने कार्यवाहीचे आदेश
शबनम न्यूज | प्रतिनिधी
मावळ तालुक्यातील विविध विकासकामे, नागरिकांच्या मूलभूत समस्या आणि शासनाच्या योजनांच्या अंमलबजावणीचा सखोल आढावा घेण्यासाठी वडगाव मावळ येथील शासकीय विश्रामगृहात खासदार श्रीरंग आप्पा बारणे आणि आमदार सुनील शेळके यांच्या प्रमुख उपस्थितीत महत्त्वपूर्ण आढावा बैठक पार पडली. या बैठकीला तहसीलदार, पोलीस विभागाचे वरिष्ठ अधिकारी, गटविकास अधिकारी तसेच विविध शासकीय विभागांचे अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
बैठकीत तालुक्यातील पाणीपुरवठा, आरोग्य सुविधा, शिक्षण विभाग, वीजपुरवठा, कृषी, पशुसंवर्धन, घरकुल योजना, मनरेगा, जलसंधारण, ग्रामीण रस्ते, परिवहन, वनविभाग तसेच कायदा-सुव्यवस्था या विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. अनेक गावांमधून प्राप्त झालेल्या तक्रारी आणि प्रलंबित प्रश्न अधिकाऱ्यांसमोर मांडण्यात आले. यावेळी काही प्रश्नांवर तातडीने निर्णय घेत संबंधित अधिकाऱ्यांना जागेवरच कार्यवाही करण्याचे आदेश देण्यात आले.
सध्या पाऊस अपेक्षेप्रमाणे सुरू न झाल्यामुळे निर्माण झालेल्या पाणीटंचाईच्या समस्येवर विशेष चर्चा करण्यात आली. ज्या गावांमध्ये पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर होत आहे, त्या ठिकाणी तातडीने उपाययोजना राबवून नागरिकांना दिलासा देण्याच्या सूचना संबंधित विभागांना देण्यात आल्या. तसेच ग्रामीण भागातील आरोग्य सेवा अधिक सक्षम करण्यासाठी आवश्यक मनुष्यबळ व सुविधा उपलब्ध करून देण्याबाबतही निर्देश देण्यात आले.
शिक्षण विभागाच्या कामकाजाचा आढावा घेताना शाळांमधील मूलभूत सुविधा, विद्यार्थ्यांच्या अडचणी आणि प्रलंबित विकासकामे तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या. तालुक्यातील विविध विकासकामे दर्जेदार पद्धतीने आणि निश्चित कालमर्यादेत पूर्ण झाली पाहिजेत, याबाबत खासदार बारणे आणि आमदार शेळके यांनी अधिकाऱ्यांना स्पष्ट शब्दांत निर्देश दिले.
यावेळी आमदार सुनील शेळके यांनी तालुक्यात सुरू असलेल्या अवैध धंद्यांबाबत तीव्र नाराजी व्यक्त करत पोलीस प्रशासनाला कठोर कारवाई करण्याच्या सूचना दिल्या. नागरिकांच्या सुरक्षेशी कोणतीही तडजोड खपवून घेतली जाणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला. कायदा-सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी आणि अवैध व्यवसायांवर आळा घालण्यासाठी नियमित मोहीम राबविण्याचे आदेश देण्यात आले.
खासदार श्रीरंग बारणे यांनी केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजना शेवटच्या घटकापर्यंत प्रभावीपणे पोहोचल्या पाहिजेत, यासाठी प्रशासनाने समन्वयाने काम करण्याचे आवाहन केले. जनतेच्या समस्या वेळेत सोडविणे, प्रलंबित कामांना गती देणे आणि विकासकामांमध्ये कोणताही हलगर्जीपणा सहन केला जाणार नाही, असा स्पष्ट इशाराही यावेळी देण्यात आला.
मावळ तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी आणि नागरिकांच्या दैनंदिन समस्यांवर प्रभावी तोडगा काढण्यासाठी ही बैठक अत्यंत महत्त्वपूर्ण ठरली असून आगामी काळात विविध विभागांच्या कामकाजावर नियमितपणे लक्ष ठेवले जाणार असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले.


