spot_img
spot_img
spot_img

iphone 17 PRO खरेदीचा बहाणा; बनावट पेमेंट स्क्रीनशॉट दाखवून 1.35 लाखांची फसवणूक

पिंपरी-चिंचवड प्रतिनिधी | युनूस खतीब

मावळ तालुक्यातील वराळे फाटा परिसरात मोबाईल विक्रेत्याची तब्बल 1 लाख 35 हजार रुपयांची फसवणूक झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. आयफोन 17 प्रो खरेदी करण्याच्या बहाण्याने आलेल्या एका अज्ञात तरुणाने बनावट ऑनलाइन पेमेंटचा स्क्रीनशॉट दाखवून मोबाईल घेऊन पोबारा केला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी सुरेश एकनाथ गोपाळे (वय 41) यांच्या विजय सेलवन मोबाईल शॉपीमध्ये 16 जून रोजी सायंकाळी एक तरुण आला. त्याने आयफोन 17 प्रो खरेदी करण्याची इच्छा व्यक्त करून मोबाईलची किंमत ऑनलाइन पाठवल्याचे सांगितले. त्याने मोबाईल अॅपवरून 1 लाख 50 हजार रुपये पाठवल्याचा बनावट स्क्रीनशॉट दाखवून विश्वास संपादन केला. तसेच तो स्क्रीनशॉट फिर्यादीच्या मोबाईलवरही पाठविला.

बँक खात्यात रक्कम जमा झाल्याची खात्री न करता मोबाईल दिल्यानंतर संबंधित तरुण पसार झाला. प्रत्यक्षात कोणतीही रक्कम खात्यात जमा झाली नसल्याचे लक्षात आल्यानंतर फसवणुकीचा प्रकार उघड झाला.

याप्रकरणी तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम 316(2) व 318(4) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस पुढील तपास करीत आहेत.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!