पिंपरी-चिंचवड प्रतिनिधी : युनूस खतीब
भोसरीतील गवळीनगर परिसरात अवैधरित्या देशी-विदेशी मद्याची वाहतूक करणाऱ्या दोघांविरुद्ध गुन्हे शाखेने कारवाई करत मोठा मद्यसाठा जप्त केला. याप्रकरणी एका आरोपीला अटक करण्यात आली असून दुसऱ्याला नोटीस बजावण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १५ जून रोजी सायंकाळी पिरबाबा दर्ग्याजवळ, जुने सरकारी रुग्णालय रोड परिसरात गुन्हे शाखा युनिट-३ च्या पथकाने छापा टाकला. यावेळी आरोपींकडून दोन बॉक्समध्ये १८० मिलीच्या ९६ देशी दारूच्या बाटल्या तसेच एका बॉक्समध्ये १८० मिलीच्या ४८ विदेशी मद्याच्या बाटल्या असा मद्यसाठा जप्त करण्यात आला.
विनापरवाना मद्याची वाहतूक करत असताना आरोपी पोलिसांच्या हाती लागले. या प्रकरणी हरी राम वाघमारे आणि अभिजित प्रकाश गुंडेकर यांच्याविरुद्ध महाराष्ट्र दारुबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अभिजित गुंडेकर याला अटक करण्यात आली असून हरी वाघमारे याला नोटीस देण्यात आली आहे.


