पिंपरी-चिंचवड प्रतिनिधी : युनूस खतीब
दिघी परिसरात अवैधरित्या देशी बनावटीचे पिस्तूल आणि जिवंत काडतूस बाळगणाऱ्या एका युवकाला गुन्हे शाखेच्या मालमत्ता गुन्हे विरोधी पथकाने अटक केली. या कारवाईमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १४ जून रोजी सायंकाळी मोझे शाळेजवळील मोकळ्या मैदानात संशयित हालचाली करणाऱ्या शेखर संभाजी जाधव (वय २५) याला ताब्यात घेण्यात आले. त्याची झडती घेतली असता त्याच्याकडून सुमारे ५१ हजार रुपये किमतीचे देशी बनावटीचे लोखंडी पिस्तूल आणि एक जिवंत काडतूस जप्त करण्यात आले.
पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालय हद्दीत शस्त्रबंदी आदेश लागू असताना आरोपीने कोणताही वैध परवाना नसताना हे शस्त्र बाळगल्याचे तपासात निष्पन्न झाले. याप्रकरणी आरोपीविरुद्ध आर्म अॅक्ट तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक करण्यात आली आहे.


