पिंपरी-चिंचवड | प्रतिनिधी : युनूस खतीब
हिंजवडी फेज-३ परिसरात सुरू असलेल्या फ्लॅश जुगार अड्ड्यावर पोलिसांनी छापा टाकून तिघांविरुद्ध कारवाई केली असून एक आरोपी फरार झाला आहे. या प्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात महाराष्ट्र जुगार प्रतिबंध अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १३ जून २०२६ रोजी सायंकाळी ६.०५ वाजण्याच्या सुमारास भोईरवाडी, फेज-३ येथील सुधीर भोईर यांच्या पाणी बोअर शेजारील मोकळ्या मैदानात काहीजण पैशांवर फ्लॅश नावाचा पत्त्यांचा जुगार खेळत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार छापा टाकण्यात आला.
कारवाईदरम्यान सचिन प्रकाश राठोड (वय २६), जयपाल गणेश राठोड (वय २६) आणि धनंजय शंकर गाढवे (वय ३४) हे जुगार खेळताना आढळून आले. त्यांच्या ताब्यातून पत्ते आणि रोख रक्कम असा एकूण ४७० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
तसेच उमेश राठोड हा स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी जुगार अड्डा चालवत असल्याचे निष्पन्न झाले. मात्र पोलिसांच्या कारवाईची चाहूल लागताच तो अंधाराचा फायदा घेऊन घटनास्थळावरून पसार झाला.
या प्रकरणी पोलीस शिपाई अरुण महादू पारधी यांनी फिर्याद दिली असून हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ४१५/२०२६ दाखल करण्यात आला आहे. आरोपी धनंजय गाढवे यास बीएनएसएस कलम ३५(३) अन्वये नोटीस देण्यात आली असून फरार आरोपीचा शोध सुरू आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक साळी करीत आहेत.


