पिंपरी-चिंचवड | प्रतिनिधी : युनूस खतीब
बाणेर परिसरातील एका फ्लॅटचे कुलूप तोडून तब्बल तीन लाख रुपयांहून अधिक किमतीचे सोन्याचे दागिने, मनगटी घड्याळे आणि रोख रक्कम चोरून नेणाऱ्या आरोपीला बावधन पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणी भारतीय न्याय संहितेअंतर्गत घरफोडी आणि चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना १३ जून २०२६ रोजी सायंकाळी साडेचार ते साडेसात वाजण्याच्या दरम्यान मोहननगर, बाणेर येथील कोयना अपार्टमेंटमधील फ्लॅट क्रमांक ४०१ मध्ये घडली. याप्रकरणी प्राज संजय शेटे (वय २८, रा. मोहननगर, बाणेर) यांनी बावधन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
या प्रकरणात पोलिसांनी अनिल मिस्त्री राजभर (वय ४०, रा. भोदरी, ता. किराकत, जि. जौनपूर, उत्तर प्रदेश) याला अटक केली आहे.
फिर्यादीनुसार, आरोपीने घराच्या मुख्य दरवाजाचे लॉक तोडून घरात प्रवेश केला. त्यानंतर घरातील कपाटातून दोन सोन्याच्या अंगठ्या, सोन्याचे टॉप, दोन मनगटी घड्याळे तसेच ८ हजार रुपयांची रोख रक्कम असा एकूण ३ लाख ६ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला.
घरातील मौल्यवान वस्तू चोरीला गेल्याचे लक्षात आल्यानंतर फिर्यादी यांनी बावधन पोलिसांकडे तक्रार दाखल केली. पोलिसांनी तांत्रिक तपास आणि सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपीचा शोध घेत त्याला अटक करण्यात यश मिळविले.
सध्या आरोपीकडून अधिक चौकशी सुरू असून, त्याचा इतर घरफोडीच्या गुन्ह्यांमध्ये सहभाग आहे का याचा तपास पोलीस करत आहेत.
या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक पवार करीत आहेत.


