सोलापूर | प्रतिनिधी
सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर तालुक्यात रविवारी अत्यंत दुर्दैवी दुर्घटना घडली. म्हसवड-पंढरपूर मार्गावरील तांदूळवाडी गावाजवळ भाविकांना घेऊन जाणारे पिकअप वाहन भरधाव वेगात विहिरीत कोसळल्याने ८ जणांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये ४ महिला आणि ४ लहान मुलांचा समावेश असून, ५ जण जखमी झाले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, पंढरपूर तालुक्यातील रांजणी गावातील भाविक म्हसवड येथील सिद्धनाथाच्या दर्शनासाठी गेले होते. दर्शन आटोपून गावाकडे परतत असताना तांदूळवाडी गावाजवळ चालकाचे नियंत्रण सुटल्याने पिकअप रस्त्यालगत असलेल्या पाण्याने तुडुंब भरलेल्या विहिरीत कोसळले.
अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले. त्यानंतर पोलीस, अग्निशामक दल, महसूल प्रशासन आणि जिल्हा प्रशासनाच्या पथकांनी घटनास्थळी पोहोचून बचावकार्य हाती घेतले. विहिरीतून सर्व मृतदेह बाहेर काढण्यात आले असून जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
स्थानिकांच्या माहितीनुसार, संबंधित विहिरीभोवती कोणतेही संरक्षणात्मक कठडे नसल्याने वाहन थेट विहिरीत जाऊन पडले. या दुर्घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
मृतांची नावे
इंदुबाई दशरथ बावचे
पूजा अमोल सातोरे
पूजा बालाजी बावचे
अश्विनी संदीप बावणे
संस्कार संदीप बावणे
संस्कृती संदीप बावचे
आरव अमोल सातोरे
समर्थ बालाजी बावणे
जखमींची नावे
संदीप दशरथ बावचे
बालाजी दशरथ बावचे
जिया बालाजी बावचे
आरव बालाजी बावचे
सागर सावकार चौगुले
या भीषण दुर्घटनेमुळे रांजणी गावासह संपूर्ण परिसरात शोककळा पसरली असून प्रशासनाकडून अपघाताच्या नेमक्या कारणांचा तपास सुरू आहे.


