spot_img
spot_img
spot_img

गॅस बिलाच्या बहाण्याने ज्येष्ठ नागरिकाची तब्बल १.९९ लाखांची ऑनलाईन फसवणूक

पिंपरी चिंचवड प्रतिनिधी : युनूस खतीब

गॅस कनेक्शनचे थकीत बिल भरण्याच्या बहाण्याने सायबर भामट्याने एका ज्येष्ठ नागरिकाची तब्बल १ लाख ९९ हजार १२८ रुपयांची फसवणूक केल्याची घटना मावळ तालुक्यातील गहुंजे येथे उघडकीस आली आहे. याप्रकरणी शिरगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी राजेंद्र नरहरी कोठनिस (वय ६७, रा. लोढा बेलमोडो, गहुंजे) यांना १० एप्रिल रोजी एका अज्ञात व्यक्तीने फोन करून मुंबई येथील घराच्या गॅस कनेक्शनचे बिल थकीत असल्याचे सांगितले. बिल न भरल्यास गॅस कनेक्शन बंद करण्यात येईल, अशी भीती दाखवत आरोपीने फिर्यादीच्या व्हॉट्सअॅपवर “महानगर गॅस” नावाची APK फाईल पाठवली.

फिर्यादींनी त्या फाईलद्वारे बिल भरण्याचा प्रयत्न करताना आपल्या आयसीआयसीआय बँकेच्या क्रेडिट कार्डची माहिती भरली. त्यानंतर बिलाचे पेमेंट अयशस्वी झाल्याचा संदेश आला. मात्र काही वेळातच त्यांच्या क्रेडिट कार्डमधून १,९९,१२८ रुपये परस्पर काढून घेण्यात आले.

या प्रकरणी संदीप कुमार गुप्ता याच्याविरोधात भारतीय न्याय संहिता कलम ३१८ (२) तसेच माहिती तंत्रज्ञान अधिनियम कलम ६६ (क), ६६ (ड) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास शिरगाव पोलीस करत आहेत.

सायबर गुन्हेगारांकडून APK फाईल, लिंक किंवा अॅप डाउनलोड करण्यास सांगितल्यास नागरिकांनी सावध राहावे, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!