पिंपरी चिंचवड प्रतिनिधी : युनूस खतीब
संत तुकारामनगर पोलिसांनी नेहरूनगर परिसरात कारवाई करत विनापरवाना बंदूक आणि जिवंत काडतुसे बाळगणाऱ्या एका व्यक्तीला अटक केली आहे. आरोपीकडून २५ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ११ जून रोजी रात्री दोस्ती बेकरीमागील वाल्मिकी चाळ परिसरात गस्तीदरम्यान अजयकुमार गोपाल सिंह (वय ३७) याच्याकडे संशयास्पद हालचाली आढळून आल्या. झडती घेतली असता त्याच्याकडे एक बारा बोअर बंदूक आणि पाच जिवंत काडतुसे आढळून आली.
विशेष म्हणजे, पिंपरी-चिंचवड पोलीस सहआयुक्तांनी १० जून ते २३ जून या कालावधीत घातक शस्त्रे बाळगण्यास मनाई आदेश जारी केलेले असतानाही आरोपीने या आदेशाचे उल्लंघन केल्याचे तपासात समोर आले. तसेच संबंधित अग्निशस्त्र बाळगण्याचा कोणताही वैध परवाना त्याच्याकडे नसल्याचे पोलिसांनी सांगितले.
या प्रकरणी संत तुकारामनगर पोलीस ठाण्यात भारतीय शस्त्र अधिनियम १९५९ चे कलम ३(२५) तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम ३७(१)(३) सह १३५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला अटक करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.


