पिंपरी-चिंचवड प्रतिनिधी : युनूस खतीब
घरगुती वापराच्या गॅस सिलेंडरमधील गॅस बेकायदेशीररित्या छोट्या सिलेंडरमध्ये भरून चढ्या दराने विक्री करणाऱ्या एका इसमाला आळंदी पोलिसांनी रंगेहात पकडले आहे. या कारवाईत ३० हजार ४०० रुपयांचा अवैध गॅस साठा आणि रिफिलिंगसाठी वापरले जाणारे साहित्य जप्त करण्यात आले.
ही कारवाई चिंबळी येथील लोखंडे वस्ती परिसरात करण्यात आली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गजानन रामराव पौळ (वय ४५) हा घरगुती गॅस सिलेंडरमधील गॅस विनापरवाना छोट्या ४ किलोच्या सिलेंडरमध्ये भरत होता. अत्यंत धोकादायक पद्धतीने सुरू असलेल्या या प्रकारामुळे परिसरातील नागरिकांच्या जीविताला धोका निर्माण होण्याची शक्यता होती.
आरोपीकडून गॅस ट्रान्सफर करण्यासाठी वापरले जाणारे साहित्य आणि भरलेले सिलेंडर जप्त करण्यात आले असून त्याच्याविरोधात आळंदी पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम २८७ तसेच जीवनावश्यक वस्तू कायदा १९५५ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक दुधमल करीत आहेत.


