पिंपरी-चिंचवड प्रतिनिधी : युनूस खतीब
चिखली परिसरातील जमिनीच्या वादातून एका कन्स्ट्रक्शन व्यावसायिकावर तिघांनी मिळून हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मारहाणीत व्यावसायिकाचा दात पडला असून त्यांना गंभीर दुखापत झाली आहे. याप्रकरणी चिखली पोलीस ठाण्यात तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अतुरसिंग दयालसिंग चंदानी (वय ५५, रा. निगडी) हे त्यांच्या जागेवरील कार्यालय बंद करून घरी जात असताना आरोपी सुशील गुप्ता, अनिल शेलार आणि युवराज शेलार यांनी त्यांना अडवले. जागेच्या मालकीवरून झालेल्या वादानंतर आरोपींनी संगनमत करून फिर्यादीला शिवीगाळ करत मारहाण केली.
यावेळी एका आरोपीने फिर्यादीच्या चेहऱ्यावर व डोळ्यावर मुक्के मारले, तर दुसऱ्याने सिमेंटचा गट्टू तोंडावर फेकून मारल्याने त्यांचा दात पडला. तसेच कोयता दाखवत “पुन्हा येथे दिसलास तर मारून टाकू,” अशी धमकीही देण्यात आली.
या प्रकरणी चिखली पोलिसांनी भारतीय न्याय संहिता तसेच शस्त्र कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला असून आरोपी फरार आहेत. पोलीस उपनिरीक्षक जाधव व देवकुळे पुढील तपास करीत आहेत.


