पिंपरी-चिंचवड प्रतिनिधी : युनूस खतीब
पिंपरी रेल्वे स्टेशन परिसरात काम असल्याचे सांगून एका तरुणाला गाठत तिघांनी त्याच्याकडे पैशांची मागणी केली. पैसे देण्यास नकार दिल्यानंतर तरुणाला बेदम मारहाण करून त्याचा मोबाईल व रोकड जबरदस्तीने लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून एका आरोपीला अटक करण्यात आली आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, तोहीद मुन्ना शेख (वय २२, रा. तथागत हाऊसिंग सोसायटी, पिंपरी) यांनी फिर्याद दिली आहे. दि. ९ जून रोजी पहाटे ३ वाजण्याच्या सुमारास पिंपरी रेल्वे स्टेशनजवळील भारतनगर सार्वजनिक शौचालय परिसरात ही घटना घडली.
याप्रकरणी यश चंद कांबळे, सुदर्शन थोरात व शिव पवार (सर्व रा. भारतनगर, पिंपरी) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींनी फिर्यादीकडे पैशांची मागणी केली. त्याने नकार दिल्यानंतर लाथाबुक्क्यांनी मारहाण करून जखमी केले. त्यानंतर त्याच्या खिशातील सुमारे १५ हजार रुपये किमतीचा रियलमी कंपनीचा मोबाईल फोन आणि ७०० रुपयांची रोकड जबरदस्तीने हिसकावून नेल्याचा आरोप आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास पिंपरी पोलीस करीत आहेत.


