शबनम न्यूज | प्रतिनिधी
चिंचवड येथील श्रीमान महासाधू मोरया गोसावी मंदिर परिसरात दर महिन्याच्या चतुर्थीला मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी होत असते. या पार्श्वभूमीवर मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्यांवर उभारल्या जाणाऱ्या अनधिकृत स्टॉल्सवर कारवाई करण्याची मागणी नगरसेवक सुरेश भोईर यांनी महापालिकेकडे केली आहे.
याबाबत त्यांनी प्रभाग अधिकारी, ‘ब’ क्षेत्रीय कार्यालय यांना निवेदन दिले आहे. निवेदनात मंदिरासमोर आणि आजूबाजूच्या परिसरात काही व्यापारी अनधिकृतपणे स्टॉल्स उभारून व्यवसाय करत असल्याचा उल्लेख करण्यात आला आहे. काही दिवसांपूर्वी एका स्टॉलवरून विकत घेतलेल्या चादरीवर “मेड इन पाकिस्तान” असा उल्लेख आढळल्याचा प्रकार समोर आल्यानंतर नागरिकांमध्ये संताप व्यक्त करण्यात आला होता.
या पार्श्वभूमीवर भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी दर महिन्याच्या चतुर्थीला मंदिर परिसरातील रस्त्यांवर कोणतेही अनधिकृत स्टॉल उभारण्यास परवानगी देऊ नये तसेच नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर तातडीने कारवाई करावी, अशी मागणी नगरसेवक भोईर यांनी प्रशासनाकडे केली आहे.
मंदिर परिसरातील सुरक्षा, वाहतूक व्यवस्था आणि भाविकांची गैरसोय टाळण्यासाठी महापालिकेने कठोर पावले उचलावीत, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली आहे.


