पिंपरी-चिंचवड प्रतिनिधी : युनूस खतीब
पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाने कारवाई करत सार्वजनिक ठिकाणी वेश्याव्यवसायासाठी ग्राहकांना आकर्षित करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी दोन महिलांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. ७ जून २०२६ रोजी सायंकाळी ५.५८ वाजण्याच्या सुमारास दिघी येथील योगीराज चौकाकडून चाकण चौकाकडे जाणाऱ्या रस्त्यावर, श्री गुरु देहुकर महाराज फड, श्री क्षेत्र आळंदी यांच्या लोखंडी कमानीजवळील पत्र्याच्या कंपाऊंडलगत सार्वजनिक फुटपाथवर ही कारवाई करण्यात आली.
याप्रकरणी दोन महिला आरोपींविरुद्ध दिघी पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक २६४/२०२६ दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी म्हणून संतोष सूर्यकांत म्हस्के (पोलीस हवालदार, अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्ष, पिंपरी-चिंचवड) यांनी तक्रार दिली आहे.
तक्रारीनुसार, आरोपी महिलांनी वेश्याव्यवसाय करण्याच्या उद्देशाने सार्वजनिक ठिकाणी येणाऱ्या-जाणाऱ्या नागरिकांना शब्दांनी बोलावणे, डोळ्यांनी खुणा करणे तसेच हातवारे करून लैंगिक हावभाव करणे अशा प्रकारे ग्राहक आकर्षित करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे सार्वजनिक ठिकाणी अडथळा निर्माण होऊन सार्वजनिक शिष्टाचार व सभ्यतेचा भंग झाल्याचा आरोप आहे.
या प्रकरणी अनैतिक व्यापारास प्रतिबंध अधिनियम, १९५६ च्या कलम ८ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास महिला पोलीस उपनिरीक्षक भोईर करीत आहेत.


