spot_img
spot_img
spot_img

भोसरीत अवैध गॅस रिफिलिंगवर आणखी एक कारवाई; एक आरोपी अटकेत, दोघांविरुद्ध गुन्हा दाखल

शबनम न्यूज | प्रतिनिधी

भोसरी परिसरात घरगुती गॅस सिलेंडरमधून बेकायदेशीररीत्या गॅस भरून विक्री करणाऱ्यांविरोधात पोलिसांनी धडक कारवाई सुरू ठेवली आहे. चक्रपाणी रोड येथील जय श्रीराम गॅस सर्व्हिस परिसरात करण्यात आलेल्या कारवाईत दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून एका आरोपीला अटक करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. ७ जून २०२६ रोजी सायंकाळी ६.३० वाजण्याच्या सुमारास जय श्रीराम गॅस सर्व्हिस, चक्रपाणी रोड, भोसरी येथे ही कारवाई करण्यात आली. याप्रकरणी अक्षय प्रभाकर कांबळे (वय २०, रा. चक्रपाणी वसाहत, भोसरी, मूळ रा. सावरगाव, जि. लातूर) आणि अजय चिंचाले (रा. चक्रपाणी, भोसरी) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील आरोपी क्रमांक १ अक्षय कांबळे याला पोलिसांनी अटक केली आहे.

तपासात आरोपी घरगुती वापरासाठी असलेले व अत्यावश्यक सेवेमधील गॅस सिलेंडर खरेदी करून त्यातील गॅस विनापरवाना मोठ्या सिलेंडरमधून छोट्या लोखंडी सिलेंडरमध्ये भरत असल्याचे उघड झाले. ही प्रक्रिया कोणत्याही सुरक्षाविषयक उपाययोजना न करता आणि मानवी जीवितास गंभीर धोका निर्माण होईल अशा पद्धतीने केली जात असल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे.

कारवाईदरम्यान पोलिसांनी अवैध गॅस साठा, गॅस ट्रान्सफर करण्यासाठी वापरण्यात येणारे साहित्य आणि इतर मुद्देमाल असा एकूण १२ हजार ९०० रुपयांचा माल जप्त केला. हा साठा अधिक दराने विक्री करून आर्थिक फायदा मिळविण्याच्या उद्देशाने ठेवण्यात आल्याचा आरोप आहे.

याप्रकरणी भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक २२९/२०२६ दाखल करण्यात आला असून भारतीय न्याय संहिता कलम २८७, २८८, जीवनावश्यक वस्तू अधिनियम १९५५ चे कलम ३ व ७ तसेच स्फोटक पदार्थ अधिनियम १९०८ चे कलम ५ अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

या प्रकरणातील फिर्यादी पोलीस शिपाई प्रभाकर हनुमंत खाडे असून पुढील तपास भोसरी पोलीस करीत आहेत. वरिष्ठ पोलीस निरीक्षक टापरे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!