शबनम न्यूज | प्रतिनिधी
पिंपरी : पिंपळे गुरव येथील सुदर्शन नगर चौकाजवळील ‘८ टू ८० गार्डन’ परिसरातील अंडरपासमध्ये वारंवार होणाऱ्या अपघातांमुळे नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या पार्श्वभूमीवर माजी विरोधी पक्षनेते तथा नगरसेवक नाना काटे यांनी पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या आयुक्तांकडे तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.
नाशिक फाटा ते हिंजवडी बीआरटीएस मार्गावरील सुदर्शन नगर चौकात विकसित करण्यात आलेल्या अंडरपासमध्ये सामान्य वाहतुकीसाठी स्वतंत्र रस्ता आणि बीआरटीएससाठी स्वतंत्र मार्गिका आहे. नियमानुसार या मार्गिकेत केवळ अत्यावश्यक सेवांची वाहनेच प्रवेश करू शकतात. मात्र, प्रत्यक्षात अनेक खासगी वाहने या मार्गाचा वापर करत असल्याने अपघातांचे प्रमाण वाढत असल्याचा आरोप नाना काटे यांनी केला आहे.
विशेषतः अंडरपासमधील बीआरटीएस मार्गात तीव्र वळण (शार्प टर्न) आणि अपुरा प्रकाश असल्याने वाहनचालकांचा अंदाज चुकून गंभीर अपघात घडत आहेत. या ठिकाणी आतापर्यंत अनेक नागरिकांना जीव गमवावा लागला असून गेल्या आठवड्यातच तीन अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यामध्ये दोन नागरिकांचा मृत्यू झाला असून २१ वर्षीय आयान अयाज शेख याचाही दुर्दैवी मृत्यू झाला आहे.
या पार्श्वभूमीवर नाना काटे यांनी महापालिका प्रशासनाला निवेदन देत अंडरपासमधील अपघात रोखण्यासाठी तातडीने प्रभावी उपाययोजना करण्याची मागणी केली आहे. बीआरटीएस मार्गात खासगी वाहनांचा प्रवेश रोखण्यासाठी सुरक्षा रक्षक नेमावेत, आवश्यक ठिकाणी प्रकाशयोजना वाढवावी, इशारा फलक व सुरक्षाव्यवस्था उभारावी तसेच भविष्यात अशा दुर्घटना टाळण्यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी त्यांनी केली आहे.
या मार्गावरील वाढत्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर महापालिका प्रशासन कोणती पावले उचलते, याकडे परिसरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.


