शबनम न्यूज | प्रतिनिधी
पुणे : मुंबई-पुणे महामार्गालगत बोपोडी येथील सुमारे २०० वर्षे जुनी ऐतिहासिक ‘हजरत शम्सुद्दीन कादरी रहमतुल्लाह अलैह’ दर्गाह पुणे महानगरपालिकेकडून पाडण्यात आल्याच्या घटनेचे पडसाद शहरात उमटत असून, या कारवाईविरोधात ‘नॅशनल कॉन्फरन्स फॉर मायनॉरिटी’च्या वतीने पुणे मनपा आयुक्तांना निवेदन सादर करण्यात आले. संघटनेचे नेते राहुल डंबाळे आणि अंजूम इनामदार यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने आयुक्त, उपमहापौर परशुराम वाडेकर आणि पोलिस उपायुक्त प्रशांत अमृतकर यांची भेट घेऊन तीव्र निषेध नोंदविला.
यावेळी संबंधित कारवाईस जबाबदार असलेल्या अधिकाऱ्यांवर तात्काळ गुन्हे दाखल करण्याची मागणी करण्यात आली. तसेच खडकी पोलीस ठाण्यात यासंदर्भात कायदेशीर तक्रार अर्जही दाखल करण्यात आल्याची माहिती देण्यात आली. शिष्टमंडळात दर्गा ट्रस्टचे आरिफ पिरजादे, मुनाफ शेख, इफ्तेकार पिरजादे, सादिक शेख, गफ्फार तुर्क, मुनव्वर कुरेशी, अहमद सय्यद, उस्मान तांबोळी यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.
संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, संबंधित दर्गा कोणतेही नवीन अतिक्रमण नसून पुणे महानगरपालिकेच्या ११ मार्च २०१६ च्या अधिकृत जाहीर प्रकटनात त्याची नोंद आहे. तसेच दर्गा हा ‘द बॉम्बे पब्लिक ट्रस्ट ॲक्ट, १९५०’ अंतर्गत नोंदणीकृत असल्याचा दावा करण्यात आला. सिटी सर्व्हे उतारा, वीजबिल आणि अन्य शासकीय कागदपत्रे अस्तित्वात असतानाही प्रशासनाने मध्यरात्री कारवाई केल्याचा आरोप करण्यात आला.
‘नॅशनल कॉन्फरन्स फॉर मायनॉरिटी’ने आपल्या निवेदनात पुणे महानगरपालिका अल्पसंख्याक समाजाच्या धार्मिक स्थळांवर निवडक कारवाया करत असल्याचा आरोप केला आहे. अशा कारवायांमुळे शहरातील सामाजिक सलोखा आणि शांततेला धक्का पोहोचत असल्याचे संघटनेचे म्हणणे आहे.
निवेदनात संघटनेने काही प्रमुख मागण्या केल्या आहेत. त्यामध्ये शहरातील सर्व धर्मीयांच्या अधिकृत व अनधिकृत धार्मिक स्थळांचे सर्वेक्षण करून त्यांची यादी सार्वजनिक करणे, धार्मिक स्थळांवरील कारवाईसाठी समान निकषांवर आधारित कालबद्ध कार्यक्रम जाहीर करणे आणि संबंधित दर्ग्यावर कारवाई करणाऱ्या अधिकाऱ्यांवर निलंबन व गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करणे यांचा समावेश आहे.
दरम्यान, या प्रकरणामुळे शहरातील राजकीय आणि सामाजिक वर्तुळात चर्चा सुरू झाली असून प्रशासनाकडून यावर काय भूमिका घेतली जाते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
या अन्यायकारक कारवाईमुळे मुस्लिम समाज बांधवांच्या धार्मिक भावनांना तीव्र ठेच पोहोचली असून समाजात तेढ निर्माण करण्याचा हा जाणीवपूर्वक कट रचला गेला आहे, या कारणास्तव शिष्टमंडळाने आज खडकी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांची भेट घेऊन दोषींवर ‘धार्मिक भावना दुखावणे’ (BNS कलमांनुसार) गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. जर प्रशासनाने आणि पोलिसांनी दोषींवर तात्काळ कडक कायदेशीर कारवाई केली नाही, तर ‘नॅशनल कॉन्फरन्स फॉर मायनॉरिटी’च्या माध्यमातून संपूर्ण पुणे शहरातील शांतताप्रिय आणि पुरोगामी जनतेला सोबत घेऊन तीव्र सनदशीर व लोकशाही मार्गाने आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा राहुल डंबाळे आणि अंजूम इनामदार यांनी दिला आहे.
या शिष्टमंडळात ‘नॅशनल कॉन्फरन्स फॉर मायनॉरिटी’चे पदाधिकारी, विविध सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी, स्थानिक नागरिक आणि ‘हजरत शम्सुद्दीन साहेब कादरी दर्गा ट्रस्ट’चे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
– अंजूम इनामदार अध्यक्ष :मूलनिवासी मुस्लिम मंच


