spot_img
spot_img
spot_img

२४ तास सुरू राहणार दुकाने व आस्थापने; महेश गुप्ता यांच्या पाठपुराव्याला मोठे यश

शबनम न्यूज | प्रतिनिधी

भारतीय जनता पार्टी व्यापारी आघाडी – पुणे शहरचे अध्यक्ष महेश गुप्ता यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला मोठे यश मिळाले असून, पुणे शहरातील व्यापारी वर्गाच्या विविध प्रश्नांबाबत महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले आहेत. यामुळे व्यापाऱ्यांमध्ये निर्माण झालेला संभ्रम दूर होण्यास मदत होणार आहे.

यासंदर्भात पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या अध्यक्षतेखाली व्यापारी संघटनांची विशेष समन्वय बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला सह पोलीस आयुक्त संजय दराडे, अपर पोलीस आयुक्त तेजस्वी सातपुते, महेश गुप्ता तसेच विविध व्यापारी संघटनांचे पदाधिकारी आणि प्रतिनिधी उपस्थित होते.

बैठकीत दुकाने व आस्थापनांच्या वेळांबाबत निर्माण झालेला संभ्रम, शहरातील विविध भागांमध्ये नियमांची होत असलेली वेगवेगळी अंमलबजावणी, व्यापाऱ्यांशी सन्मानपूर्वक वर्तन तसेच व्यापारी आणि पोलिस प्रशासन यांच्यातील समन्वय वाढविण्याच्या विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.

यावेळी पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी स्पष्ट केले की, सर्व अधिकृत व परवानाधारक दुकाने आणि आस्थापने यांना कायद्यानुसार २४ तास व्यवसाय सुरू ठेवण्याची परवानगी आहे. तसेच टपऱ्या, हातगाडी व्यावसायिक, फेरीवाले, पानटपऱ्या आणि तत्सम व्यवसायांना रात्री १० वाजेपर्यंत व्यवसाय करण्यास परवानगी असल्याचे त्यांनी सांगितले. या स्पष्टीकरणामुळे व्यापारी वर्गातील संभ्रम दूर झाला असून, नियमांबाबत अधिक स्पष्टता निर्माण झाली आहे.

याशिवाय व्यापाऱ्यांच्या तक्रारी, सूचना आणि समस्यांचे जलद निवारण व्हावे यासाठी स्वतंत्र नोडल ऑफिसर नियुक्त करण्याचा निर्णय घेण्यात आला. यामुळे व्यापारी आणि पोलिस प्रशासन यांच्यात थेट संवादाची प्रभावी यंत्रणा निर्माण होणार असून, व्यापाऱ्यांच्या प्रश्नांचे निराकरण अधिक वेगाने होण्यास मदत होणार आहे.

व्यापारी वर्गासाठी स्वतंत्र नोडल ऑफिसर नियुक्त करण्याची मागणी आणि त्यासाठी सातत्याने पाठपुरावा करण्यामध्ये महेश गुप्ता यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. त्यामुळे व्यापारी संघटनांनी या निर्णयाचे स्वागत करत पोलीस प्रशासनाचे आभार मानले.

या बैठकीमुळे पुणे शहरातील व्यापारी वर्ग आणि पोलिस प्रशासन यांच्यातील समन्वय अधिक मजबूत होऊन व्यापारी हिताच्या प्रश्नांना गती मिळेल, असा विश्वास महेश गुप्ता यांनी व्यक्त केला.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!