spot_img
spot_img
spot_img

पुणे पोलीस दलात मोठी प्रशासकीय उलथापालथ; ११ पोलीस निरीक्षकांच्या बदल्या

पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांचे आदेश; विविध पोलीस ठाण्यांतील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या पदस्थापनांमुळे खळबळ११

शबनम न्यूज | प्रतिनिधी

पुणे शहर पोलीस आयुक्तालयात प्रशासकीय कारणास्तव मोठ्या प्रमाणावर अंतर्गत फेरबदल करण्यात आले असून तब्बल ११ पोलीस निरीक्षकांच्या तात्पुरत्या पदस्थापनांचे आदेश पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी जारी केले आहेत. शहरातील विविध महत्त्वाच्या पोलीस ठाण्यांमध्ये नव्या अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आल्याने पोलीस दलात चर्चांना उधाण आले आहे.

आयुक्तालयाने जारी केलेल्या आदेशानुसार, कोथरूड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप देशमाने यांची फरासखाना पोलीस ठाण्यात बदली करण्यात आली आहे. तर वाहतूक शाखेत कार्यरत असलेले पोलीस निरीक्षक रुणाल मुल्ला यांच्याकडे डेक्कन पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकपदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.

काळेपडळ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मानसिंग पाटील यांची भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात नियुक्ती करण्यात आली असून, विश्रामबाग पोलीस ठाण्याच्या गुन्हे शाखेतील पोलीस निरीक्षक अरुण घोडके यांची कोथरूड पोलीस ठाण्यात वरिष्ठ पोलीस निरीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. लोणीकाळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे यांची विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात बदली करण्यात आली आहे.

लष्कर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष खेतमाळस यांना कोंढवा पोलीस ठाण्याची जबाबदारी देण्यात आली आहे. तसेच गुन्हे शाखेतील पोलीस निरीक्षक पंडित रेजितवाड यांची वानवडी पोलीस ठाण्यात, तर गुन्हे शाखेतीलच पोलीस निरीक्षक युवराज हांडे यांची लष्कर पोलीस ठाण्यात नियुक्ती करण्यात आली आहे.

याशिवाय डेक्कन पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक गिरीषा निंबाळकर यांची काळेपडळ पोलीस ठाण्यात बदली करण्यात आली आहे. खडक पोलीस ठाण्याच्या गुन्हे शाखेतील पोलीस निरीक्षक संजय करनूर यांची नऱ्हे पोलीस ठाण्यात तर लष्कर पोलीस ठाण्याच्या गुन्हे शाखेतील पोलीस निरीक्षक प्रदीप पवार यांची लोणीकाळभोर पोलीस ठाण्याच्या गुन्हे शाखेत नियुक्ती करण्यात आली आहे.

शहरातील कायदा व सुव्यवस्था अधिक प्रभावी करण्याबरोबरच गुन्हेगारी नियंत्रण, तपासकामाची गती आणि प्रशासकीय कार्यक्षमतेत वाढ करण्याच्या उद्देशाने हे फेरबदल करण्यात आल्याचे पोलीस सूत्रांकडून सांगण्यात आले. दरम्यान, पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी सर्व संबंधित अधिकाऱ्यांना तातडीने नव्या पदस्थापनेच्या ठिकाणी रुजू होऊन कार्यभार स्वीकारण्याचे तसेच त्याबाबतचा अनुपालन अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.

या बदल्यांमुळे पुणे शहरातील अनेक महत्त्वाच्या पोलीस ठाण्यांच्या नेतृत्वात बदल झाला असून त्याचा परिणाम आगामी काळात पोलीस कामकाजावर दिसून येणार असल्याची चर्चा पोलीस वर्तुळात सुरू आहे.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!