शबनम न्यूज | प्रतिनिधी
पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या मालमत्ता गुन्हे विरोधी पथकाने अवैधरित्या सुरू असलेल्या गॅस रिफिलिंग व्यवसायावर कारवाई करत १ लाख ३०० रुपये किमतीच्या ८१ गॅस टाक्या जप्त केल्या आहेत. ही कारवाई उत्तर महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील खराबवाडी येथे करण्यात आली.
पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांच्या आदेशानुसार अवैध व्यवसायांवर कठोर कारवाई सुरू असून, त्याअंतर्गत मालमत्ता गुन्हे विरोधी पथकाने ही कारवाई केली.
गुप्त माहितीच्या आधारे छापा
२ जून २०२६ रोजी पोलिसांना खराबवाडी, चाकण-महाळुंगे रोड येथील “जय गणेश भारत गॅस” या दुकानात अवैध गॅस रिफिलिंग सुरू असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पथकाने छापा टाकला.
कारवाईदरम्यान आरोपी सचिन प्रकाश म्हस्करे (वय ३१, रा. खराबवाडी, ता. खेड) हा एका विधी संघर्षग्रस्त बालकासोबत घरगुती गॅस सिलेंडरमधून इतर सिलेंडरमध्ये गॅस भरत असल्याचे आढळून आले. कोणतीही सुरक्षा उपाययोजना न करता हा व्यवसाय सुरू असल्याने मानवी जीवितास गंभीर धोका निर्माण होण्याची शक्यता होती.
जप्त माल
एकूण ८१ गॅस टाक्या जप्त
जप्त मालाची किंमत : १,००,३०० रुपये
गुन्हा दाखल
आरोपीविरुद्ध उत्तर महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ४७९/२०२६ दाखल करण्यात आला आहे.
लावण्यात आलेली कलमे :
भारतीय न्याय संहिता कलम २८७, २८८
जीवनावश्यक वस्तू अधिनियम १९५५ चे कलम ३ व ७
स्फोटक पदार्थ अधिनियम १९०८ चे कलम ५
या प्रकरणाचा पुढील तपास उत्तर महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाणे करत आहे.
कारवाई करणारे अधिकारी
ही कारवाई पोलीस उपआयुक्त (गुन्हे) रोहिदास पवार, सहाय्यक पोलीस आयुक्त डॉ. विशाल हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय चव्हाण, पोलीस निरीक्षक पांडुरंग देवकाते, गोरक्षनाथ बालवडकर तसेच मालमत्ता गुन्हे विरोधी पथकातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी पार पाडली.


