पिंपरी चिंचवड प्रतिनिधी : युनूस खतीब
आळंदी : बेकायदेशीर दारूविक्रीविरोधात आळंदी पोलिसांनी धानोरे परिसरात कारवाई करत ९६ लिटर गावठी हातभट्टी दारू जप्त केली. या प्रकरणी एका व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विकासवाडी, धानोरे येथील एस. के. इंजिनिअरिंग कंपनीच्या भिंतीमागे आरोपी पिंटू नगजी नट (वय ३५) हा गावठी हातभट्टी दारूचा साठा करून बसल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार छापा टाकण्यात आला असता आरोपीच्या ताब्यात अंदाजे ९६ लिटर तयार हातभट्टी दारू आढळून आली.
जप्त करण्यात आलेल्या दारूची किंमत सुमारे ४ हजार ८०० रुपये असून ती बेकायदेशीररीत्या साठवून ठेवण्यात आल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.
या प्रकरणी आळंदी पोलीस ठाण्यात महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.


