spot_img
spot_img
spot_img

“मी साईनगरचा भाई आहे!” म्हणत मैदानात दहशत

पिंपरी-चिंचवड | प्रतिनिधी : युनूस खतीब

मावळ तालुक्यातील गहुंजे परिसरात किरकोळ वादातून दहशतीचा थरार उघडकीस आला आहे. “मी साईनगरचा भाई आहे” अशी धमकी देत तिघांनी तरुणावर दांडक्याने हल्ला करत दगडफेक केली. एवढ्यावरच न थांबता आरोपींनी फिर्यादीच्या घरासमोर जाऊन गेट तोडत कुटुंबीयांनाही धमकावल्याची घटना घडली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रेमराज केशव सोळंकी (वय २८) हे साई रेसिडेन्सीसमोरील मैदानात उभे असताना आरोपी नागेश जगले याने “मैदान खाली करा” असे म्हणत शिवीगाळ सुरू केली. फिर्यादीने जाब विचारताच आरोपीने धक्काबुक्की करत “इथे राहायचे असेल तर इज्जतीत रहा, मी कोणालाही जिवंत सोडणार नाही” अशी धमकी दिली.

यानंतर नागेश जगले याने हातातील लाकडी दांडका हवेत फिरवत परिसरात दहशत निर्माण केली. त्याचवेळी अभिषेक जगले आणि योगेश दडस यांनी फिर्यादीवर दगडफेक सुरू केली. अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे मैदानातील नागरिकांमध्ये घबराट पसरली आणि लोक सैरावैरा पळू लागले.

आरोपींनी फिर्यादीवर दांडक्याने मारहाण करत चेहरा व मानेवर ओरखडे काढले. तसेच फिर्यादीच्या आईलाही धक्काबुक्की करण्यात आली. नंतर आरोपींनी थेट फिर्यादीच्या घरासमोर जाऊन शिवीगाळ करत गेट तोडून नुकसान केल्याचे तक्रारीत नमूद आहे.

या प्रकरणी तळेगाव दाभाडे पोलिसांनी तिघांविरोधात गुन्हा दाखल करून आरोपींना अटक केली असून पुढील तपास मपोउपनि गावडे करीत आहेत.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!