पिंपरी-चिंचवड प्रतिनिधी | युनूस खतीब
पिंपरी-चिंचवड शहरातील संत तुकारामनगर मेट्रो स्टेशन परिसरात बुधवारी सकाळी भीषण अपघात घडला असून भरधाव ट्रकने पाण्याच्या टँकरला जोरदार धडक दिल्याने एका तरुण कामगाराचा मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली.
हा अपघात दि. २१ मे २०२६ रोजी सकाळी सुमारे ७.१० वाजण्याच्या सुमारास संत तुकारामनगर मेट्रो रेल्वे स्टेशनजवळील पिलर क्रमांक पी-३३५ जवळ, मेट्रो पुलाखाली घडला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी गणेश शंकर जाधव हे टँकरद्वारे मेट्रो पुलाखालील झाडांना पाणी टाकण्याचे काम करत होते. त्यावेळी त्यांच्या टँकरच्या पाठीमागून भरधाव वेगाने आलेल्या ट्रक (MH 43 BG 3020) चालकाने निष्काळजीपणे वाहन चालवत टँकरला जोरदार धडक दिली.
या भीषण धडकेत टँकरचे मोठे नुकसान झाले. तसेच फिर्यादीसोबत काम करणारा कामगार शामसुंदर शेषराम गौतम (वय २२, रा. दापोडी) गंभीर जखमी झाला. उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याची माहिती पोलिसांनी दिली.
अपघातानंतर परिसरात नागरिकांची मोठी गर्दी झाली होती. घटनेची माहिती मिळताच पिंपरी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला.
या प्रकरणी ट्रक चालक नरेशकुमार सुरेंद्र दास (वय २४) याच्याविरोधात भारतीय न्याय संहिता २०२३ अंतर्गत कलम २८१, १०६ (१), ३२४ (४) तसेच मोटार वाहन कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी त्याला अटक केली आहे.
सहाय्यक पोलीस निरीक्षक लोहार पुढील तपास करीत आहेत.


