spot_img
spot_img
spot_img

म्हाडाचे रो-हाऊस देण्याच्या आमिषाने तब्बल ७४ लाखांची फसवणूक!

पिंपरी-चिंचवड प्रतिनिधी | युनूस खतीब

पिंपरी-चिंचवड शहरात घर खरेदीचे स्वप्न दाखवून लाखो रुपयांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. संत तुकारामनगर परिसरात म्हाडाचे रो-हाऊस मिळवून देण्याचे आमिष दाखवत एका दाम्पत्याकडून तब्बल ७४ लाख २० हजार रुपये उकळल्याप्रकरणी चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही घटना मार्च २०२४ ते २१ मे २०२६ या कालावधीत संत तुकारामनगर, पिंपरी येथे घडली. याप्रकरणी पुनम रामप्रसाद शर्मा (वय ४४) यांनी संत तुकारामनगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींमध्ये प्रदीप मारुती गोपळघरे (रा. कोथरूड), गोकुळ नामदेव माहिते (रा. आंबेगाव खुर्द), निखील अंबाजी पवार (रा. खराळवाडी) आणि कुलदीप सिंग मोहिंदर सिंग एधी (रा. संत तुकारामनगर) यांचा समावेश आहे.

आरोपींनी आपापसात संगनमत करून संत तुकारामनगर येथील ययाती गल्ली क्रमांक १ मधील १४ नंबरचे म्हाडाचे रो-हाऊस खरेदी करून देण्याचे आमिष फिर्यादी आणि त्यांच्या पतीला दाखवले. विश्वास संपादन करत आरोपींनी वेळोवेळी रोख रक्कम तसेच ऑनलाईन व्यवहारांद्वारे तब्बल ७४ लाख २० हजार रुपये घेतले.

मात्र, पैसे घेतल्यानंतरही संबंधित रो-हाऊसचा व्यवहार पूर्ण न करता आरोपींनी फसवणूक केल्याचे उघड झाले. मोठी रक्कम गमावल्याचे लक्षात आल्यानंतर फिर्यादींनी पोलिसांकडे धाव घेतली.

या प्रकरणी संत तुकारामनगर पोलिस ठाण्यात भारतीय न्याय संहिता २०२३ अंतर्गत कलम ३१८ (४), ३१६ (२) आणि ३(५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सहाय्यक पोलीस निरीक्षक पांडे पुढील तपास करीत आहेत.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!