spot_img
spot_img
spot_img

‘शतप्रतिशत भाजपा’चा विचार घराघरांत पोहोचवा – रवींद्र चव्हाण

लोणावळ्यात भाजपाचे प्रशिक्षण महाअभियान; विचारधारा, संघटनात्मक शिस्त आणि तंत्रज्ञान वापरावर भर

पिंपरी : भारतीय जनता पार्टी परिवाराच्या वतीने देशभरात सुरू असलेल्या ‘पंडित दीनदयाळ उपाध्याय प्रशिक्षण महाअभियान २०२६’ अंतर्गत पिंपरी-चिंचवड शहर जिल्ह्याचा भव्य निवासी प्रशिक्षण वर्ग नुकताच लोणावळा येथे उत्साहात संपन्न झाला. दोन दिवस चाललेल्या या प्रशिक्षण वर्गात पक्षाची विचारधारा, संघटनात्मक शिस्त, समाजाप्रती असलेली बांधिलकी आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर या विषयांवर सखोल मार्गदर्शन करण्यात आले.

या महाअभियानात महाराष्ट्रातील विविध प्रमुख नेत्यांनी सहभाग घेत कार्यकर्त्यांना तब्बल १२ विषयांवर मार्गदर्शन केले. जिल्ह्यातील १५० हून अधिक पदाधिकाऱ्यांनी या निवासी प्रशिक्षण वर्गात सहभाग नोंदविला.

भव्य उद्घाटन आणि प्रदर्शनी

प्रशिक्षण वर्गाच्या ठिकाणी पक्षाच्या स्थापनेपासूनचा इतिहास दर्शवणारी भव्य प्रदर्शनी उभारण्यात आली होती. या प्रदर्शनीचे उद्घाटन भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते भारतमाता, डॉ. श्यामा प्रसाद मुखर्जी आणि पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या प्रतिमांचे पूजन व दीपप्रज्वलन करून करण्यात आले.

यावेळी बोलताना रवींद्र चव्हाण यांनी “शतप्रतिशत भाजपा” हा विचार प्रत्येक घरापर्यंत पोहोचवण्याचे आवाहन केले. देशात हजारो राजकीय पक्ष असले तरी केवळ भाजपामध्येच सातत्यपूर्ण आणि शाश्वत कार्य सुरू असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला. पिंपरी-चिंचवडमध्ये भाजपाचा सुवर्णकाळ सुरू असून कार्यकर्त्यांनी नागरिकांना “हवेहवेसे” वाटतील अशी कामे करावीत, असेही त्यांनी सांगितले.

सार्वजनिक जीवनात वावरताना पक्षाची प्रतिमा जपणे ही प्रत्येक कार्यकर्त्याची जबाबदारी असल्याचे सांगत त्यांनी पक्षशिस्त, परस्पर सन्मान आणि प्रामाणिक कार्यकर्त्यांना संधी देण्यावर भर दिला. “पिंपरी-चिंचवडच्या प्रत्येक गल्लीमध्ये भाजपा दिसला पाहिजे,” असेही ते म्हणाले.

या उद्घाटन प्रसंगी व्यासपीठावर चित्रा वाघ, महेश लांडगे, शंकर जगताप, अमित गोरखे, अश्विनी जगताप, माजी खासदार अमर साबळे, शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.

पहिला दिवस : वैचारिक आणि संघटनात्मक सत्रे

पहिल्या दिवशी कार्यकर्त्यांना वैचारिक आणि संघटनात्मकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी सात सत्रांचे आयोजन करण्यात आले. चित्रा वाघ यांनी ‘व्यावहारिक सत्र’, तर प्रदेश मुख्यालय प्रभारी रवींद्र अनासपुरे यांनी ‘वैचारिक अधिष्ठान’ या विषयावर मार्गदर्शन केले.

यानंतर योगेश टिळेकर यांनी ‘कार्य विस्तार’, प्रदेश उपाध्यक्ष केशवजी उपाध्ये यांनी ‘मीडिया व्यवस्थापन’, तर संजय केळकर यांनी भाजपाची ‘कार्य पद्धती’ यावर भाष्य केले.

संध्याकाळच्या सत्रांमध्ये श्रीकांत भारतीय यांनी ‘देशासमोरची आव्हाने’ या विषयावर मार्गदर्शन केले, तर गणेश खणकर यांनी ‘कार्यकर्ता विकास, संगोपन आणि जबाबदारी’ यावर प्रभावी मांडणी केली.

दुसरा दिवस : बूथ व्यवस्थापन ते सोशल मीडिया

दुसऱ्या दिवसाची सुरुवात योगा व व्यायाम सत्राने झाली. त्यानंतर पश्चिम महाराष्ट्र विभागीय संवादक योगेश बाचल यांनी बूथ व्यवस्थापन, ‘मन की बात’, स्थायी कार्यक्रम आणि SIR या विषयांवर कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले.

सुनील कर्जतकर यांनी भाजपाचा इतिहास उलगडून सांगितला, तर प्रशांत ठाकूर यांनी मोदी सरकारच्या योजनांबाबत माहिती दिली.

प्रदेश प्रवक्ते विश्वास पाठक यांनी सोशल मीडिया, AI, नमो ॲप आणि सरळ ॲप यांसारख्या आधुनिक तंत्रज्ञान साधनांचा प्रभावी वापर कसा करावा याचे प्रशिक्षण दिले. अंतिम सत्रात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जिल्हा कार्यवाह नरेंद्र पेंडसे यांनी ‘विचार परिवार’ या विषयावर मार्गदर्शन केले.

नियोजनाचे कौतुक

शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा प्रमुख व संघटन सरचिटणीस ॲड. मोरेश्वर शेडगे यांनी संपूर्ण प्रशिक्षण वर्गाचे नियोजन नेटकेपणाने पार पाडले. मधुकर बच्चे, संजय परळीकर, संजय पटणी, भूषण जोशी, अमेय देशपांडे आणि सचिन राऊत यांनी त्यांना सहकार्य केले.

या दोन दिवसीय प्रशिक्षण महाअभियानाला कार्यकर्त्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. अशा प्रशिक्षण वर्गांमुळे संघटन अधिक सक्षम, शिस्तबद्ध आणि गतिमान होत असून समाजाच्या प्रत्येक घटकापर्यंत सेवा, विकास आणि राष्ट्रहिताचा विचार पोहोचविण्यास निश्चितच प्रेरणा मिळेल, असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!