spot_img
spot_img
spot_img

व्हॉट्सअ‍ॅप ट्रेडिंग ग्रुपच्या आमिषाला बळी; गुंतवणुकीच्या नावाखाली २१ लाखांची सायबर फसवणूक

पिंपरी चिंचवड प्रतिनिधी : युनूस खतीब

पिंपरी-चिंचवड परिसरात ऑनलाईन ट्रेडिंग आणि गुंतवणुकीच्या आमिषाने फसवणुकीच्या घटना वाढत असून, दिघी परिसरातील एका नागरिकाची तब्बल २१ लाख ३४ हजार ३९९ रुपयांची सायबर फसवणूक झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी दिघी पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे “S-VIP 7 MOTILAL OSWAL” नावाच्या व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपमध्ये सहभागी झाल्यानंतर आरोपींनी वेगवेगळ्या मोबाईल क्रमांकांवरून व्हॉईस कॉल आणि मेसेजद्वारे संपर्क साधला. ट्रेडिंगमध्ये गुंतवणूक केल्यास मोठा नफा मिळवून देण्याचे आमिष आरोपींनी दाखविले.

आरोपींच्या सांगण्यानुसार फिर्यादी यांनी विविध बँक खात्यांवर पैसे ट्रान्सफर करत एकूण २१ लाख ३४ हजार ३९९ रुपये “risseastock.top” या ऑनलाईन ट्रेडिंग प्लॅटफॉर्मवरील खात्यात गुंतवले. काही दिवसांनी फिर्यादी यांच्या खात्यावर तब्बल १ कोटी रुपयांहून अधिक रक्कम दिसू लागल्याने त्यांचा विश्वास अधिकच वाढला.

मात्र, ही रक्कम काढण्याचा प्रयत्न करताच खाते ‘ब्लॉक’ झाल्याचा संदेश दिसून आला. त्यानंतर आरोपींनी पुन्हा संपर्क साधून “कॅपिटल गेन टॅक्स”च्या नावाखाली आणखी १५ लाख रुपये भरण्याची मागणी केली. यासाठी व्हॉट्सअ‍ॅपवर बनावट टॅक्स लेटरही पाठविण्यात आले.

फिर्यादी यांनी वारंवार विनंती करूनही आरोपींनी पैसे परत देण्यास नकार दिला. अखेर आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी पोलिसांकडे धाव घेत तक्रार दाखल केली.

या प्रकरणी दिघी पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम ३१६ (२), ३१८ (४), ३३६ (३), ३४० (२), ३ (५) तसेच माहिती तंत्रज्ञान अधिनियम २००८ अंतर्गत कलम ६६ (सी) आणि ६६ (डी) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

सायबर तज्ज्ञांच्या मते, सोशल मीडियावरील ट्रेडिंग ग्रुप, बनावट गुंतवणूक अ‍ॅप्स आणि अवास्तव नफ्याचे आश्वासन हे सायबर गुन्हेगारांचे नवे हत्यार बनले असून नागरिकांनी अशा आमिषांपासून सावध राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!