विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर यांची स्वतंत्र चौकशीची मागणी
शबनम न्यूज | प्रतिनिधी
सांगवी येथील सरकार सेतू पुलावरील रोषणाई आणि सुशोभीकरण कामामध्ये मोठ्या प्रमाणात आर्थिक अनियमितता झाल्याचा गंभीर आरोप समोर आला आहे. पिंपरी-चिंचवड महापालिकेचे विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर यांनी महापालिका आयुक्तांकडे लेखी तक्रार करत या संपूर्ण प्रकरणाची स्वतंत्र तांत्रिक व आर्थिक चौकशी करण्याची मागणी केली आहे.
विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर यांनी दिलेल्या निवेदनानुसार, महापालिकेच्या स्थापत्य विभागाकडून प्राप्त माहितीत पुलाच्या कामासाठी मोठ्या प्रमाणात एम.एस. (MS) साहित्य वापरल्याचे नमूद करण्यात आले आहे. मात्र, प्रत्यक्ष पाहणीत पुलावरील लोखंडी साहित्याचे प्रमाण अधिकृत नोंदीपेक्षा लक्षणीय कमी असल्याचे स्थानिक नागरिकांच्या निदर्शनास आले आहे.
निवेदनात नमूद केल्याप्रमाणे, पुलावरील लोखंडी साहित्याचे प्रत्यक्ष वजन सुमारे ५० मेट्रिक टनांच्या आसपास असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला असून, डीएसआर दरानुसार साहित्य, फॅब्रिकेशन आणि इतर पूरक खर्च मिळून संपूर्ण प्रकल्पाचा खर्च जास्तीत जास्त पाच कोटी रुपयांपर्यंत अपेक्षित असल्याचा दावा करण्यात आला आहे. मात्र, या कामावर सुमारे २२ कोटी रुपये खर्च झाल्याची माहिती समोर आल्याने सुमारे १७ कोटी रुपयांच्या खर्चाबाबत गंभीर संशय निर्माण झाला आहे.
या पार्श्वभूमीवर भाऊसाहेब भोईर यांनी संपूर्ण प्रकरणाची स्वतंत्र तांत्रिक समितीकडून प्रत्यक्ष मोजमाप व साहित्य पडताळणी, स्वतंत्र आर्थिक लेखापरीक्षण (ऑडिट) तसेच अंदाजपत्रक, मोजमाप पुस्तिका (MB), बिले, देयके आणि मंजुरी आदेशांची सखोल तपासणी करण्याची मागणी केली आहे.
सार्वजनिक निधीशी संबंधित हे प्रकरण अत्यंत गंभीर स्वरूपाचे असल्याने महापालिका प्रशासनाने यामध्ये तातडीने चौकशीचे आदेश द्यावेत, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.


