spot_img
spot_img
spot_img

स्वर्गीय प्रमोदजी महाजन स्वच्छ व हरित पिंपरी चिंचवड शहर योजना सुरू करणार – महापौर रवि लांडगे

शबनम न्यूज | प्रतिनिधी

स्वर्गीय प्रमोदजी महाजन यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ ‘स्वच्छ व हरित पिंपरी चिंचवड शहर योजना’ लवकरच सुरू करण्यात येईल, ही योजना महापालिका आणि नागरिकांच्या लोकसहभागातून यशस्वी करण्यात येईल, असे प्रतिपादन महापौर रवि लांडगे यांनी केले.

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने पर्यावरण संवर्धन, शहरातील हरित क्षेत्र वाढविणे आणि नागरिकांमध्ये वृक्षसंवर्धनाबाबत जनजागृती निर्माण करण्याच्या उद्देशाने निगडी प्राधिकरण येथील गणेश तलाव, स्वातंत्र्यवीर सावरकर उद्यान येथे आयोजित नियोजन बैठकीत महापौर रवि लांडगे बोलत होते.

या बैठकीस उपमहापौर शर्मिला बाबर, आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी, नगरसदस्या शैलजा मोरे, नगरसदस्य अमित गावडे,अतिरिक्त आयुक्त कुलदीप जंगम, विक्रांत बगाडे,मुख्य उद्यान अधीक्षक महेश गारगोटे, सह शहर अभियंता बापू गायकवाड, उपायुक्त अण्णा बोदडे, कार्यकारी अभियंता सुनील पवार, जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक, सामाजिक कार्यकर्ते प्रा.नामदेव जाधव,निलेश शिंदे, सुर्यकांत मुथियान,विजय नाईक यासह निगडी प्राधिकरण रेसिडेंट फोरमचे पदाधिकारी, पर्यावरणप्रेमी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

महापौर रवि लांडगे यावेळी म्हणाले, वाढते शहरीकरण आणि बदलते हवामान लक्षात घेता पर्यावरण संतुलन राखणे ही येत्या काळाची गरज आहे. प्रत्येक नागरिकाने आपल्या परिसरात किमान एक तरी वृक्ष लावून त्याचे संगोपन करण्याची जबाबदारी स्वीकारली पाहिजे. महापालिका नागरिकांना रोपे, खत तसेच आवश्यक तांत्रिक सहकार्य उपलब्ध करून देणार आहे. शहरात पुढील काळात तब्बल २ लाख वृक्षारोपण करण्याचा मानस असून, त्यासाठी विविध सामाजिक संस्था, पर्यावरणप्रेमी आणि नागरिकांचा सक्रिय सहभाग घेतला जाणार आहे, असे देखील त्यांनी सांगितले.

आयुक्त डॉ.विजय सूर्यवंशी म्हणाले, महापालिकेच्या राखीव भूखंडांच्या परिसरात मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण करण्याचे नियोजन आहे. तसेच शहरातील निवडक ठिकाणी ‘डेन्स फॉरेस्ट’ विकसित करण्याची संकल्पना राबविण्यात येणार असून, त्यामुळे शहरातील हरित क्षेत्रात मोठी वाढ तर तापमानात घट होईल. पर्यावरणपूरक आणि शाश्वत शहर उभारण्यासाठी महापालिका विविध उपक्रम प्रभावीपणे राबवत असल्याचे देखील त्यांनी नमूद केले.

यावेळी महापौर रवि लांडगे यांच्या हस्ते वृक्षारोपण देखील करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रफुल्ल पुराणिक यांनी केले, तर अतिरिक्त आयुक्त विक्रांत बगाडे यांनी उपस्थितांचे आभार मानले.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!