पिंपरी चिंचवड प्रतिनिधी | युनूस खतीब
पिंपरी-चिंचवड शहरातील मोशी परिसरात गुरुवारी रात्री घडलेल्या थरारक घटनेत आरपीआय कामगार आघाडी महाराष्ट्राचे अध्यक्ष अनिल मोरे यांची धारदार शस्त्राने वार करून निर्घृण हत्या करण्यात आली. या घटनेमुळे शहरात एकच खळबळ उडाली असून राजकीय व सामाजिक वर्तुळात संताप व्यक्त केला जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मोशी परिसरातील युवराज रेस्टॉरंट अँड बार येथे गुरुवारी रात्री सुमारे नऊ वाजण्याच्या सुमारास अनिल मोरे उपस्थित असताना अज्ञात आरोपींनी त्यांच्यावर अचानक हल्ला चढवला. आरोपींनी धारदार शस्त्राने सपासप वार करत त्यांना गंभीर जखमी केले. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या मोरे यांना तातडीने रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.
घटनेनंतर मोशी परिसरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले असून पोलिसांनी परिसरात बंदोबस्त वाढवला आहे. हत्या नेमकी कोणत्या कारणातून करण्यात आली याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. वैयक्तिक वाद, राजकीय वैमनस्य किंवा अन्य कोणत्या कारणातून हा हल्ला झाला का, याचा तपास पोलीस करत आहेत.
सध्या अनिल मोरे यांच्या मृतदेहाचे शवविच्छेदन वायसीएम रुग्णालयात करण्यात आले आहे. दरम्यान, आरोपींना तात्काळ अटक करण्यात यावी, अशी मागणी आरपीआय कार्यकर्त्यांकडून करण्यात येत आहे. “जोपर्यंत मारेकऱ्यांना पोलीस अटक करत नाहीत, तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही,” असा इशारा आरपीआय कामगार आघाडीच्या कार्यकर्त्यांनी दिल्याने वातावरण अधिकच तापले आहे.
या प्रकरणी पोलिसांकडून सीसीटीव्ही फुटेज, प्रत्यक्षदर्शींची चौकशी तसेच तांत्रिक तपास सुरू करण्यात आला असून आरोपींचा शोध घेण्यासाठी विशेष पथके रवाना करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.
या घटनेमुळे पिंपरी-चिंचवड शहरातील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.


