spot_img
spot_img
spot_img

व्हॉट्सअॅप व्हिडीओ कॉलद्वारे मोबाईल हॅक; बँक खात्यांतील रक्कम लंपास

‘कस्टमर केअर’च्या नावाखाली महिलेची ६.८७ लाखांची ऑनलाईन फसवणूक

पिंपरी चिंचवड प्रतिनिधी | युनूस खतीब

चिंचवड परिसरात ‘बँकेच्या कस्टमर केअर’च्या नावाखाली एका महिलेला गंडा घालून तब्बल ६ लाख ८७ हजार रुपयांची ऑनलाईन आर्थिक फसवणूक करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. व्हॉट्सअॅप व्हिडीओ कॉलद्वारे मोबाईल हॅक करून आरोपींनी बँक खात्यांमधील रक्कम काढून घेतल्याने शहरात पुन्हा एकदा सायबर सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना दि. ९ एप्रिल २०२६ रोजी सकाळी १०.३० वाजल्यापासून ते दि. १३ एप्रिल २०२६ रोजी रात्री १० वाजेपर्यंत घडली. फिर्यादी महिलेने आपल्या मित्राला ऑनलाईन बँकिंगद्वारे पैसे पाठवले होते. मात्र चुकून ती रक्कम दुसऱ्याच बँक खात्यात जमा झाली. पैसे परत मिळवण्यासाठी महिलेने बँकेच्या कस्टमर केअरशी संपर्क साधला होता.

याच संधीचा फायदा घेत आरोपींनी स्वतःला बँक अधिकारी असल्याचे भासवत महिलेचा विश्वास संपादन केला. त्यानंतर आरोपींनी विविध बँक खात्यांची माहिती घेत व्हॉट्सअॅप व्हिडीओ कॉलद्वारे महिलेचा मोबाईल हॅक केला. तसेच मोबाईलवर आलेले ओटीपी सांगण्यास भाग पाडून आयसीआयसीआय बँक आणि एचडीएफसी बँकेची खाती हॅक केली.

सायबर भामट्यांनी “तुमचे पैसे परत मिळवून देतो” असे आमिष दाखवत महिलेची गोपनीय बँक माहिती मिळवली आणि खात्यातील रक्कम विविध खात्यांमध्ये ट्रान्सफर केली. या फसवणुकीत महिलेचे एकूण ₹६,८७,००० रुपये लंपास करण्यात आले.

या प्रकरणी चिंचवड पोलीस ठाण्यात गु.र.नं. २०७/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता कलम ३१९(२), ३१८(४) तसेच माहिती तंत्रज्ञान कायदा कलम ६६(सी), ६६(डी) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या गुन्ह्यात राजीव गुप्ता याच्यासह विविध बँक खातेदारांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी अद्याप फरार आहेत. पुढील तपास पोलीस निरीक्षक (गुन्हे) रणजित जाधव करीत आहेत.

दरम्यान, बँकेच्या नावाने येणारे कॉल, लिंक, व्हिडीओ कॉल किंवा ओटीपी संदर्भातील कोणतीही माहिती कोणालाही देऊ नये, तसेच अधिकृत ग्राहक सेवा क्रमांकाची खातरजमा करूनच संपर्क साधावा, असे आवाहन पोलिसांनी नागरिकांना केले आहे.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!