spot_img
spot_img
spot_img

आरटीओ चलनाच्या बनावट APK फाईलने ३.९८ लाखांचा गंडा

पिंपरी चिंचवड प्रतिनिधी | युनूस खतीब

हिंजवडी परिसरात सायबर गुन्हेगारांनी आरटीओ ई-चलनाच्या नावाखाली नागरिकाला जाळ्यात ओढत तब्बल ३ लाख ९८ हजार ५०० रुपयांची ऑनलाईन फसवणूक केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. बनावट APK फाईल पाठवून मोबाईल हॅक करण्याचा प्रकार उघडकीस आल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना दि. ८ मे २०२६ रोजी दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास मुळशी तालुक्यातील बोडकेवाडी, विठ्ठल मंदिराजवळ घडली. फिर्यादी आपल्या राहत्या घरी असताना अज्ञात आरोपीने त्यांच्या मोबाईलवर आरटीओ चलन भरण्याची APK फाईल पाठवली.

सदर मेसेजमध्ये वाहनाचे प्रलंबित ई-चलन भरायचे असल्याचे नमूद करण्यात आले होते. त्यामुळे फिर्यादीने त्यावर विश्वास ठेवून संबंधित APK फाईल डाउनलोड केली. फाईल इन्स्टॉल केल्यानंतर फिर्यादीच्या मोबाईलवर ओटीपी आला. त्यानंतर काही क्षणांतच त्यांच्या बँक खात्यातून विविध व्यवहारांद्वारे ₹३,९८,५०० रुपये वळते करण्यात आले.

सायबर भामट्यांनी मोबाईलमध्ये अनधिकृत प्रवेश मिळवत बँकिंग माहितीचा गैरवापर करून ही फसवणूक केल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे.
या प्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात गु.र.नं. ३११/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता कलम ३१८(४) तसेच माहिती तंत्रज्ञान अधिनियम (सुधारित) २००८ चे कलम ६६(डी), ६६(सी) अंतर्गत अज्ञात आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक पाटील करीत आहेत.

दरम्यान, नागरिकांनी कोणतीही APK फाईल, ई-चलन लिंक किंवा संशयास्पद मोबाईल अॅप डाउनलोड करू नये, तसेच ओटीपी व बँकिंग माहिती कोणालाही देऊ नये, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!